राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक २ मधून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील ३९ कि.मी. सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी ५४ कोटी ३९ लाख रुपये निधी मंजुर झाला असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. आमदार राजळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघात प्रथमच सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना एवढा मोठा निधी मिळाला आहे.
याबाबत माहिती देताना आमदार राजळे म्हणाल्या दिनांक १८ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्र. २ अंतर्गत ५४ कोटी ३९ लाख रुपये किंमतीच्या सिमेंट कॉक्रीट रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
या कामांना मंजूरी मिळवण्यासाठी ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांचेकडे वेळोवेळी या कामांचा पाठपुरावा सुरु होता. या मंजूर कामामध्ये ३९ किलोमीटर सिमेंट कॉक्रीट रस्त्यांची कामे होणार आहेत.
निधी मंजुर झालेले रस्ते अत्यंत खराब व मोठ्या लांबीचे असल्याने या रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी लागणार होता. आता निधी मंजूर झाल्याने सदर कामांची तातडीने निविदा प्रकीया करुन कामे सुरु होणार आहेत. या योजनेअंतर्गत मंजुर झालेल्या रस्त्याची दहा वर्ष देखभाल व दुरुस्तीचीही तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर कामामध्ये शेवगांव तालुक्यातील प्रजिमा- ३० (ढोरजळगांव ने) तेलकुडगांव रस्ता ६ कोटी २१ लाख, प्रजिमा- ३० भातकुडगांव फाटा ते बक्तरपुर ते मजलेशहर रस्ता ६ कोटी २४ लाख, भाविनिमगांव ते सुलतानपुर ते तालुका हद्द रस्ता ५ कोटी ११ लाख, प्रजिमा ४० सुळेपिंपळगांव चेडेचांदगांव ते रामा ५० रस्ता ६ कोटी ८३ लाख रुपये निधी मंजुर झाला आहे.
त्याचप्रमाणे पाथर्डी तालुक्यातील अकोला ते करोडी रस्ता रु. ७ कोटी ५ लाख, इजिमा- ९५ तिनखडी ते पिंपळगांव टप्पा रस्ता ५ कोटी ६२ लाख, निंवडूगे ते हत्राळ रस्ता रु. ७ कोटी ५६ लाख, हनुमान टाकळी ते कोपरे रस्ता ९ कोटी ७१ लाख या कामांचा मंजूर कामामध्ये समावेश आहे.
मतदार संघात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सिमेंट कॉक्रीट रस्त्यांची कामे मंजूर केल्यामुळे आ. मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे आभार मानले आहेत. राज्य स्तरावर सतत पाठपुरावा करून रस्त्याच्या कामासाठी एवढा निधी मंजुर केल्या बद्दल मतदारसंघातील जनतेने आमदार मोनिका राजळे यांचे आभार मानले आहेत.