राहुरी तालुक्यातील कणगर येथे भर दिवसा अज्ञात भामट्याने गाढे यांच्या घरात घुसून घरातील रोख रक्कमेसह सात तोळे सोन्याचे दागीने पळवून नेल्याची घटना दि. १९ जुलै २०२४ रोजी दुपारच्या दरम्यान घडली होती.
तपासादरम्यान पोलिस पथकाला मिळून आलेले सोन्याचे गंठण गाढे यांना परत करण्यात आले. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की स्वाती अशोक गाढे (वय ३५ वर्षे) या राहुरी तालुक्यातील कणगर येथे कुटुंबासह राहतात. दि. १९ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता स्वाती गाढे यांच्या घरातील सर्वजण कामानिमित्त घराला कडी लावून घराबाहेर गेले होते.
या दरम्यान अज्ञात भामट्याने स्वाती गाढे यांच्या घरात प्रवेश करुन घरातील सात सोळे सोन्याचे दागिने, पाच भाराचे चांदीचे जोडवे आणि ५ हजार ५०० रुपए रोख रक्कम असा मुद्देमाल चोरुन नेला होता.
स्वाती अशोक गाढे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ८२९/२०२४ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या दरम्यान भामट्याने मुद्देमालातील चार तोळ्याचे सोन्याचे गंठण परत आणून ठेवले.
पोलिस पथक घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी गंठण मिळून आले. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी स्वाती अशोक गाढे यांना पोलिस ठाण्यात बोलावुन घेतले आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या हस्ते सोन्याने गंठण स्वाती गाढे यांच्या ताब्यात दिले.
त्याच वेळी तोडमल (रा. राहुरी) यांना त्यांची एक वर्षापूर्वी चोरीस गेलेली पाण्याची मोटार तपासी अधिकारी सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते यांनी आरोपीकडून जप्त करून तीसुद्धा न्यायालयाच्या आदेशाने परत करण्यात आली.
राहुरी पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्वाती गाढे यांचे चोरीस गेलेले गंठण परत मिळाले. तसेच तोडमल यांची मोटार परत मिळाली. गाढे व तोडमल या दोघांनी राहुरी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करुन पोलिस पथकाचे आभार व्यक्त केले.