Ahmednagar News : मागील पस्तीस वर्ष राजकारण, समाजकारण करीत असताना जनतेच्या हितासाठी आणि राज्याच्या विकासासाठी सरकारबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यावर्षी सादर केलेला अर्थसंकल्प गरीब आणि महिलांच्या विकासाला समोर ठेऊन करण्यात आला आहे.
महिलांना मानसन्मान देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली असून, रक्षाबंधनाच्या काळात लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते जमा करणार आहोत.

या सन्मान योजनेमुळे आर्थिक उलाढाल वाढणार आहे. विरोधक केवळ टीका करत आहेत. अजितदादा शब्दाचा पक्का आहे. दिलेला शब्द पूर्ण करणार योजना यशस्वी करणार जनतेच्या हिताची योजना विरोधकांना आवडली नाही. त्यामुळे त्याच्या पोटात दुखत आहे. अशी टीका उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी विरोधकांवर केली.
श्रीगोंदा येथे माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचाराचा शुभांरभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकरी, महिला व युवकांसह विद्यार्थ्यांच्या हिताच्या योजना महायुतीने आणल्याने सर्वच स्तरातून त्याचे स्वागत होत असून, या योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र विरोधकांना या योजना आवडल्या नसल्याने त्यांच्या पोटात दुखायला लागले.
या योजनांबाबत विरोधकांनी हा चुनावी जुमला असल्याचे सांगत या योजनेबद्दल टीका सुरू केली. मात्र अजित पवार हा शब्दाला पक्का असून आणलेल्या योजना अडचणीत येऊ देणार नाही. पुढील काळात योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी महायुतीला कायम सत्तेत ठेवा असे आवाहन उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केले
अनुराधा नागवडे म्हणाल्या की बापूचा वसा आणि वारसा घेऊन काम सुरु आहे. अजितदादाच श्रीगोंदावर लक्ष आहे. कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी लक्ष घालावे.
यावेळी नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, की महिला आमदार करण्यासाठी सर्वांचा सहभाग असावा. घोड, कुकडी पाणीप्रश्न, रस्ते, वीजप्रश्नाकडे लक्ष घातले. आता सर्वांना बरोबर घेऊन अनुराधाताईंना आमदार करण्यासाठी सर्वांनाबरोबर घेऊन विधानसभा निवडणूक लढणार असे ते म्हणाले.