बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तानसा तलाव भरून ओसंडून वाहू लागला आहे. बुधवारी दुपारी ४ वाजून १६ मिनिटांनी हा तलाव ओव्हर फ्लो झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठला होता. पाण्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई महापालिकेने १० टक्के पाणीकपात लागू केली होती. मुंबईकरांना तलाव क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा होती. जुलै महिना सुरू झाला आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली.
मागील काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने पवई, तुळशीनंतर बुधवारी तानसा तलावही ओसंडून वाहू लागले आहे. तलावांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयाची पाणी पातळी झपाट्याने वाढली असून, बुधवारी सकाळी ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या ५८.५८ टक्के इतका जलसाठा उपलब्ध झाला आहे.
तानसाची जलधारण क्षमता १४५,०८० दशलक्ष लिटर
बुधवारी ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता ही १४,५०८ कोटी लिटर (१४५,०८० दशलक्ष लिटर) एवढी आहे. हा तलाव गेल्या वर्षी २६ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.३५ वाजता, तर २०२२ मध्ये १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता आणि सन २०२१ मध्ये २२ जुलै रोजी पहाटे ०५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला होता, तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरून वाहू लागला होता.
नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा
शहापूर : सायंकाळी धरणाचे २ स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून त्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तानसा धरणाची साठवण क्षमता १२७.५१ मिमी. टीएचपी इतकी असून ओसंडून वाहण्याची क्षमता १२८.६३ मिमी. टीएचडी इतकी आहे. तानसा धरण भरल्याने तानसा नदीलगतच्या परिसरातील शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नेवरे, वेडवेहाळ, डिंबे व खैरे,
तसेच भिवंडी तालुक्यातील बोरशेती, एकसाल, चिंचवली, कुंडे, रावडी, अकलोली, वज्रेश्वरी, महाळुंगे व गणेशपुरी, वाडा तालुक्यातील निभावली, मेट व गोरांड, वसई तालुक्यातील खानिवडे, घाटेघर, शिरवली, अदने, पारोल, अंबोडे, भटाणे, साईवान, काशीद कोरगाव, कोपरगाव, हेडावडे व चिमणे या गाव, वाड्या, पाड्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.