शेअर मार्केटमध्ये इसरवाडे यांची पाच लाखांची फसवणूक, शेअर ट्रेडिंग व्यावसायिकावर शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल !

Ahmednagarlive24 office
Published:
fraud

शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील शेअर मार्केट ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्याने एका एजंटने गदेवाडीसह परिसरातील अनेकांना गंडा घालून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गदेवाडी (ता. शेवगाव) येथील शेअर मार्केट व्यवसाय करणाऱ्या तिघांविरुद्ध जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव इसरवाडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

इसरवाडे यांनी शेवगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गदेवाडी येथील अमोल अशोक कदम यांनी ए.के. ट्रेडिंग कंपनी, या नावाने आमच्या गावात शेअर मार्केट ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला. सहा महिन्यांपूर्वी अमोल अशोक कदम यांनी मला व किरण दिलीप नाईक (रा. गदेवाडी) यांना सांगितले की, ट्रेडिंग व्यवसायामध्ये तुम्ही गुंतवणूक करा, माझ्याकडे गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मी १५ टक्के परतावा मिळवून दिला आहे.

तुम्ही माझ्याकडे पैशाची गुंतवणूक केल्यास मी तुम्हाला चांगला परतावा देईल, असे सांगून आमचा विश्वास संपादन केला. मी दि. ९ मे २०२४ रोजी ४ लाख रुपये आर.टी.जी.एस. करून दिले. तसेच कदम याचे वडील अशोक बाबुराव कदम व त्यांच्या ऑफिसमधील मॅनेजर लक्ष्मण उर्फ बबलू दत्तात्रय मडके दोन्ही (रा. गदेवाडी) हे दोघेजण हेक्टर कंपनीची काळ्या रंगाची चारचाकी गाडी क्रमांक एम.एच. १६ डी.जी. ४०८६ एमजी घेऊन माझ्या मळ्यामध्ये आले व त्यावेळी त्यांनी मला ट्रेडिंग मार्केटमध्ये गुंतवणूक करा, आम्ही तुम्हाला जास्त परतावा देतो, असे सांगितल्याने मी त्यांना माझ्याकडील १ लाख रुपये रोख रक्कम दिले.

त्यानंतर मी त्यांना वेळोवेळी परताव्याचे पैसे व गुंतवणूक केलेली रक्कम मागितली. मात्र, त्यांनी आज देतो, उद्या देतो असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिले. दि. २५ जून २०२४ रोजी मला समजले की, अमोल अशोक कदम हा घरांना कुलूप लावून गावातून कुटुंबासह पळून गेला आहे. तेव्हा माझी खात्री झाली की, अमोल अशोक कदम यांनी माझी ५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

इसरवाडे यांच्याप्रमाणेच गावातील किरण दिलीप नाईक यांची १० लाख रुपये, राधाकिसन भीवसेन निकम राहणार माळेगाव (ता. शेवगाव) यांची ३ लाख रुपये, अनिता गणेश पाखरे (रा. खडका-मडका, ता. शेवगाव ) यांची १ लाख रुपये, कृष्णा अंबादास म्हस्के (रा.कांबी, ता. शेवगाव) यांची २ लाख ५० हजार रुपये, असे मिळून २१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शेवगाव पोलिसात अमोल अशोक कदम, अशोक बाबुराव कदम, लक्ष्मण उर्फ बबलू दत्तात्रय मडके या तिघांविरोधात विविध कलमांनुसार ४२०, ४०६, ४०९, ३४ अंतर्गत जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव ईसरवाडे यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe