लोकसभा निवडणूकीत झालेल्या चुका पुन्हा होवू देवू नका, स्वत:च्या गावापासून काम सुरु करा. येणा-या काळात विरोधकांच्या नकारात्मक प्रचाराला तुम्हाला तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्याचे काम करायचे आहे. विरोधकांकडे कुठलेही भांडवल आता राहीलेले नाही. महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्याची हीच संधी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचे मोठे काम आपल्याकडे आहे. पुढील साठ दिवसात प्रत्येक गावापर्यंत योजना पोहोचविण्याचे काम संघटीतपणे करा, विधानसभा निवडणूकीत महायुतीलाच यश मिळेल असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील पदाधिकारी, बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांची एकत्रित बैठक राहुरी येथे संपन्न झाली. या बैठकीला प्रदेश महामंत्री विजयराव चौधरी, संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हा सहकारी बॅकेंचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, डॉ.सुजय विखे पाटील, आ.मोणीका राजळे, वैभव पिचड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर, महिला जिल्हाध्यक्षा अर्चना थोरात, कांचन मांढरे, जेष्ठनेते सुभाष पाटील, नानासाहेब पवार, नितीन दिनकर, अरुण मुंढे, सत्यजीत कदम, बाबासाहेब वाकळे, भैय्या गंधे आदि याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, लोकसभेत पराभव स्विकारावा लागला असला तरी, देशाच्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी तिस-यांदा विराजमान झाले. याचा सर्वांना अभिमान आहे. लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने केलेल्या नकारात्मक प्रचाराला आपण उत्तर देण्यास कमी पडलो. ही चुक पुन्हा होवू द्यायची नसेल तर, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे प्रत्येक गावामध्ये पोहोचवा. सोशल मिडीयावर कोन काय चर्चा करते यापेक्षा या योजनांचीच माहीती लोकांपर्यंत पोहोचविली तर, विरोधकांच्या नकारात्मक प्रचाराला ते प्रभावी उत्तर होवू शकेल असे ना.विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात या राज्यासाठी विविध प्रकारची मदत झाली. सहकारी साखर कारखान्यांचा आयकराचा बोजा मोदी सरकारमुळे कमी झाला. इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहनही केंद्र सरकारमुळे मिळाले मात्र दहा वर्षे केंद्रात कृषि मंत्री राहूनही या राज्याच्या हिताचे एकही काम महाविकास आघाडीच्या नेत्यांना करता आले नाही. नुकत्याच सादर झालेल्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातही युवक, महिला, आदिवासी यांच्याकरीता मोठ्या निधीची तरतुद करुन, सर्वच समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली गेली असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील महायुती सरकारनेही महिलांसाठी लाडकी बहीण योजनेपासून ते शेतक-यांना मोफत वीज देण्यापर्यंत योजना जाहीर केल्या आहेत. कौशल्य विकासातून युवकांनाही रोजगाराच्या संधी निर्माण करुन दिल्या आहेत. महायुती सरकारमुळेच जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून, तीन औद्योगिक वसाहती सुरु होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आपले हित कशात आहे, हे मतदारांना समजावून सांगण्याची जबाबदारी आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे. महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्याची हीच संधी असल्याची त्यांनी सांगितले.
डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणूका जिंकायच्या असतील तर, सर्वांना मोठे मन ठेवावे लागेल. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रत्येक आमदारा आपला महत्वाचा आहे. लोकसभा निवडणूकीत केवळ अपप्रचार झाला. मागील पाच वर्षात केलेला विकास अवघ्या दोन महिन्यात कुठे वाहून गेला हेही समजले नाही. सत्ता आली तरच कार्यकर्ते जिवंत राहतील यासाठी आपला लोकप्रतिनिधी महत्वाचा आहे. महायुती सरकार आले तरच सामान्य माणसाला न्याय मिळेल, विकासाची कामे मार्गी लागतील, कोन काय भाषणबाजी करतयं याला माझ्या दृष्टीने महत्व नाही, मात्र कार्यकर्त्यांना दमबाजीची भाषा झालीच तर जशासतसे उत्तर देण्यास मागेपुढे पाहू नका. तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असे त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वासित केले.
महामंत्री विजय चौधरी यांनी महायुती सरकारमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले. मात्र केवळ विरोधी बाजू पुढे आणून सरकारला बदनाम करणारे चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांना मराठा समाजाला न्याय देता आला नाही. लोकसभा निवडणूकीत धार्मिक तेढ निर्माण करुन, महाविकास आघाडीने विजय मिळविला असला तरी, विधानसभा निवडणूकीत नियोजनबध्द पध्दतीने आपल्याला सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिवाजीराव कर्डीले, आ.मोणीका राजळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कारगील विजय दिनानिमित्ताने शहिद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.