Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मोसमी पावसा संदर्भात. खरे तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागात तर अतिवृष्टी झाली आहे. यामुळे राज्यातील काही प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
तसेच नदी, नाल्यांना देखील मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यामुळे पुणे, कोल्हापूर, सोलापूर अशा अनेक भागांमध्ये सध्या पूरस्थिती पाहायला मिळत आहे. कोकणात देखील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे काही भागात सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या पूर परिस्थितीमुळे शेती पिकांवर देखील विपरीत परिणाम होत आहे. पण आज काही भागांमधील पूरस्थिती ओसरली असून पुन्हा एकदा सर्वसामान्य जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशातच, आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे.
पंजाबरावांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, राज्यात आज आणि उद्या अर्थातच 26 आणि 27 जुलैला उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पूर्व आणि पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचा मुक्काम राहणार आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे.
या काळात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मुंबई, इगतपुरी, छत्रपती संभाजी नगर या भागात जोराचा पाऊस होणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे. तसेच मराठवाडा आणि उर्वरित राज्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी होणार असला तरी देखील एकाच वेळी कोणत्याच भागात पाऊस विश्रांती घेणार नाही. तसेच त्यांनी 26 जुलैपासून म्हणजेच आजपासून ते दोन ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात असाच पाऊस सुरू राहणार असे म्हटले आहे.
या काळात वेगवेगळ्या भागात पावसाचा दोन-दोन दिवसाचा मुक्काम पाहायला मिळणार अशी शक्यता आहे. तसेच त्यांनी 30 जुलैपासून ते दोन ऑगस्टपर्यंत राज्यातील मराठवाडा, दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात चांगला जोरदार पाऊस होणार असा अंदाज यावेळी दिला आहे.
पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजातं 15 मे ते 30 मे दरम्यान ज्या भागात अवकाळी पाऊस होत असतो त्या ठिकाणी पावसाळी काळात जोरदार मोसमी पाऊस हजेरी लावतो अशी मोठी माहिती देखील दिली आहे.
म्हणजे यावर्षी ज्या-ज्या ठिकाणी 15 मे ते 30 मे या पंधरा दिवसांच्या कालावधीत अवकाळी पाऊस झाला असेल तिथे यंदाच्या पावसाळी काळात चांगला समाधानकारक पाऊस होणार आहे.