आषाढी वारीच्या विशेष बसेसमुळे कोपरगाव आगाराला १९ लाखांचे उत्पन्न !

Ahmednagarlive24 office
Published:
kopargaon busstand

आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. कोपरगाव आगाराच्या एकूण ३० बसेस होत्या.

त्या बसेसमधून ७ ते २१ जुलै या १४ दिवसात २१२ फेऱ्या झाल्या असून ११००० प्रवाशांकडून कोपरगाव आगाराला सवलतींसह एकूण १९ लाख ७ हजार ६४८ रुपये इतके उत्पन्न मिळाले, अशी माहिती आगारप्रमुख अमोल बनकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

तसेच माहे जून मध्ये कोपरगाव आगाराला समन्वय मूल्य पकडून २५ लाख रुपयांचा नफा होऊन आगार प्रथम क्रमांकावर आले आहे. असेही त्यांनी सांगितले आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्रीविठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनाला लाखो वारकरी पायी जातात.

मात्र ज्यांना पायी जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी कोपरगाव बसस्थानकातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष बसेसचे नियोजन केले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २४ फेऱ्या वाढविल्या असून साधारण दोन लाख रुपयाचे उत्पन्न गेल्या वर्षापेक्षा वाढले आहे.

दरम्यान, राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव आगारा मार्फत आजपर्यंत एकूण चार हजार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अहिल्यादेवी होळकर मोफत पास दिले आहेत. तर ३ हजार विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरातील मोफत पास देण्यात आले आहेत. कोपरगाव आगारामार्फत विद्यार्थ्यांना सेवा देण्यात येत आहे.

या सर्वांसाठी विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यंत्र अभियंता अमर पंडित, विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक अमोल बनकर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक योगेश दिघे, आगार लेखकार सुरेखा गवळी, वाहतूक निरीक्षक गिरीश खेळणार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक नारायण आहेर यांचे सहकार्य लाभले आहे.

लवकरच नव्या ४० इलेक्ट्रिकल बस
कोपरगाव बस आगाराला ४० इलेक्ट्रिकल नव्या बस मिळणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात एकूण १८० बस गाड्या येणार आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe