Ahmednagar News : यंदा मान्सूनने दमदार हजेरी लावली असून आतापर्यंतच्या रासरीच्या तुलनेत १६८.३ टक्के पाऊस झाला आहे. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरू होती.
२४ तासांत ४.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, शुक्रवारी मात्र, आषाढ सरींनी विश्रांती घेतली असून, सूर्यदर्शनही झाले. पुढील चार दिवसात हलक्या स्वरूपात सरी कोसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दक्षिण नगर जिल्ह्याचे तारणहार म्हणून ओळखले जाणारे मुळा धरण शुक्रवारी १३ हजार ७१५ (५३ टक्के) भरले. दोन दिवसांपासून मुळा नदीला आलेला पूर ओसरला असून कोतुळ येथून धरणाकडे ११ हजार १५२ क्यूसेकने आवक सुरू आहे.
दैनंदिन सरासरी १० हजार क्यूसेकने आवक सुरू राहिल्यास २० ऑगस्टपर्यंत धरण भरेल. असा अंदाज असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सायली पाटील व धरण शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी दिली. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाचा सध्याचा पाणीसाठा १३ हजार ७१५ दशलक्ष घनफूटांवर पोहोचला आहे.
गेल्या सहा दिवसांमध्ये ३ हजार ७६२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले आहे. २१ जुलैपासून धरणाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी (दि.२६) सकाळी सहा वाजता मुळाचा पाणीसाठा १३ हजार ४१० होता.
तोच दुपारी १३ हजार ६२४ एवढा झाला. सायंकाळी सहा वाजता १३ हजार ७१५ इतका झाला. धरणाची पाणी पातळी १ हजार ७८६ इतकी आहे. शुक्रवारी दुपारी धरणात १६ हजार २६१ क्यूसेक्सने नवीन पाण्याची आवक चालू होती,
पाऊस थंडावल्याने ही आवक सायंकाळी ११ हजार १५२ क्युसेक्स एवढी झाली होती. आवक पुन्हा वाढल्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुळा धरणातील पाणीसाठा वीस टीएमसीच्या पुढे जाईल, अशी चिन्हे आहेत.
इतर धरणातील साठा…
• भंडारदरा धरण: ८ हजार ९२३ दशलक्ष घनफूट (८०.८३ टक्के)
• निळवंडे धरण : ३ हजार ५१८ दशलक्ष घनफूट (४२.२४ टक्के
• आढळा धरण: ८२८ दशलक्ष घनफूट (७८.११ टक्के)