कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात कालवड व वासरू ठार !

Ahmednagarlive24 office
Published:
bibatya

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. निमगाव गांगर्डा येथील विठ्ठल ढगे यांना त्यांच्या शेतात विहिरीवर बिबट्या दिसल्याने त्यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर पायाचे ठसांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडुन पाहणी करण्यात आली असता ते ठसे बिबट्याचेच असल्याचे आढळून आले.

परिसरात बिबट्याने येथील शेतकरी उल्हास कर्डिले यांच्या गावरान गायीच्या कालवडीवर तसेच दादासाहेब गांगर्डे यांच्या गायीच्या वासरावर हल्ला करून ठार केले. बिबट्याच्या हल्ल्यात कालवड व गायीचे वासरू ठार झाल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले असून परिसरात दहशत बसली आहे.

सध्या शेतात खरीप हंगाम कामाचे दिवस असून बिबट्याचा या भागात वावर असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड बनले आहे. या परिसरात मागील दहा दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे. या भागात बिबट्याचा वावर असल्याचे वृत्त गावात व परिसरात वाऱ्यासारखे पसरल्याने येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक आपला जीव मुठीत ठेवून वावरताना दिसत आहेत. निमगाव गांगर्डा शिवारात बिबट्याच असल्याचे ठसे आढळल्याने याठिकाणी वनविभागाकडून पिंजरा लावण्याची मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे.

सध्या पाऊस कमी अधिक प्रमाणात पडत असल्याने परिसर बदलून मानवी वस्तीकडे बिबट्या सारखे प्राणी मुक्तसंचार करून वावरत आहेत. याचा बंदोबस्त वनविभागाकडून होणे गरजेचे आहे. बिबट्याची नागरिकांत असलेली दहशत यामुळे अनेक नागरिक आता घरातून बाहेर जाण्यास ही घाबरू लागले आहेत. या भागात बिबट्या असल्याने पिंजरा लावून त्याला जेरबंद करण्याकरिता उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

निमगाव गांगर्डा शिवारात बिबट्या आढळल्याचे समजते. त्याचे पायाचे ठसे आढळल्याने नागरिकांनी भयभीत न होता सावधानता बाळगावी, रात्री शेतात जाताना सोबत बॅटरी असावी, मुलांनी एकटे जावू नये, सर्वांनी सतर्क रहावे, चुकीच्या अफवा कोणीही पसरवू नये, या शिवारात आणखीन बिबट्याचा वावर आढळल्यास पिंजरा लावण्यात येईल. असे कर्जतचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe