Ahmednagar News : ग्रामीण भागात गावाच्या विकासासाठी सरपंच अन ग्रामविकास अधिकारी ही दोन चाके मानली जातात. यातील एकजण जरी रास्ता चुकला तरी दुसरा त्याला रस्त्यावर आणतो. मात्र सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेतल्याने संतप्त झालेल्या सरपंचासह सदस्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला कार्यालयात कोंडले. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, कारेगाव येथील ग्रामविकास अधिकारी राजू भालदंड यांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामाच्या निविदा काढून टेंडर वाटप सुरु केले होते.

त्यामुळे या बाबतीत सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. मात्र त्यांना विश्वासात न घेता ठराविक ठेकेदाराला कामाच्या निविदा दिल्याने सरपंचासह सदस्य देखील ग्रामविकास अधिकाऱ्यावर नाराज होते.
दरम्यान ग्रामपंचायतची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत माहिती मागितली असता, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत टेंडरचे सर्व पेपर व माहिती देण्यास नकार देवून, अरेरावीची भाषा वापरली.
त्यामुळे सरपंच आनंद वाघ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सुनील पटारे, प्रणव भारत, जालिंदर उंडे व ग्रामस्थ प्रशांत उंडे, चंदू नागुडे, नंदकुमार तऱ्हाळ, नवनाथ पवार, सुधीर तहहऱ्हाळ, सुदाम ठोकळ, सुनील बोरुडे व प्रकाश ढाकणे आक्रमक झाले.
या सर्वांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून ग्रामविकास अधिकारी राजू भालदंड यांना कोंडले. दरम्यान, काही तासानंतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करुन अधिकाऱ्याची सुटका केली. यावेळी निविदांची आवश्यक कागदपत्रे सोमवार दि. २९ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयात दाखवली जातील, आश्वासन त्यांनी दिले.
गेल्या ७ ते ८ वर्षांपासून कारेगावामध्ये कार्यरत लोकप्रतिनिधींना कामामध्ये विश्वासात न घेता गेल्या ४ वर्षांपासून ग्रामविकास अधिकारी स्वतः कारभार पहात आहे. यामुळे ग्रामसेवकचं ठेकेदार आहेत की, काय असा सवाल संतप्त ग्रामस्थांसह सत्ताधारी सदस्यांनी यावेळी उपस्थित केला.
मासिक बैठकीसह ग्रामसभेमध्ये मांडलेले ठराव व सूचविलेल्या कामांची दखल न घेतल्यामुळे आता सरपंच व सदस्य गटविकास अधिकाऱ्यांकडे आता प्रत्येक मासिक बैठकीसह ग्रामसभेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.