आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आ. तनपुरे यांचा शब्द पाळत घेतला ‘हा’ निर्णय ; ‘त्या’ नागरिकांची होणार ‘स्वप्नपूर्ती’

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : शिर्डी-शनि शिंगणापूर या जागतिक देवस्थानाच्या मध्यवर्ती असलेल्या राहुरी शहरात सर्व सोय सुविधा असलेला शासकीय एकही रुग्णालय नाही. अपघाताच्या घटना तसेच आजारपणात वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे राहुरीत सर्व सोय सुविधा असलेले ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे.

राहुरीकरांच्या पाठबळाने आमदार व नामदार होत आ. तनपुरे यांनी महाविकास आघाडी शासन काळात राहुरीच्या ग्रामिण रुग्णालयासाठी १६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आणला. परंतु शहरातील जागे संदर्भात न्यायालयीन अडचण निर्माण झाली. त्यातच भाजपप्रणित युती शासन सत्तेवर आले.

निधी माघारी गेल्यानंतरही आ. तनपुरे यांनी ग्रामिण रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेत्यांनी शहराबाहेरील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील बीज गुणन प्रक्रिया जागेमध्ये ग्रामिण रुग्णालय बांधकामाचा शुभारंभ केला होता.

त्यामुळे राहीकर संम्रभात सापडले होते. आ. तनपुरे यांनी अखेर अधिवेशनामध्ये आरोग्य मंत्री सावंत यांना राहुरीच्या ग्रामिण रुग्णालय संदर्भात विचारणा केली. त्यावर सावंत यांनी ग्रामिण रुग्णालय शहराबाहेर नेण्याचा कोणताही आदेश निर्गमित झालेला नाही. आ. तनपुरे यांनी प्रत्यक्षात भेट घ्यावी, योग्य निर्णय घेऊ असे अधिवेशनात सांगितले. त्यानंतर आ.तनपुरे यांनी आरोग्य मंत्री सावंत यांच्या बरोबर बैठक घेतली.

त्याचे फलित म्हणून राहुरी शहरातील ग्रामिण रुग्णालय हे शहरातच राहणार असल्याचा निर्णय झाला. त्यानुसार शहरातच रुग्णालय बांधकाम इमारत बांधणीसाठी शासनाने आराखडा व अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश निर्गमित केल्याची माहिती आ. तनपुरे यांनी सोशल मीडियातून दिली आहे.

दरम्यान ग्रामीण रुग्णालय शहराबाहेर नेण्यास विरोध दर्शवित आ. तनपुरे यांनी अधिवेशनात कडाडून विरोध दर्शविला होता. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शब्द पाळत आ. तनपुरेंच्या पाठपुराव्याला दाद देत शहरातच ग्रामीण रुग्णालय बांधणीसाठी पाऊल टाकल्याने राहुरीकरांची ग्रामीण रुग्णालयाची स्वप्नपूर्ती होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

जिल्ह्यात मध्यवर्ती असलेल्या राहुरी परिसरात शासकीय रुग्णालयाची दुरवस्था आहे. अनेक वर्षांपासून ग्रामिण रुग्णालय इमारतीचा प्रश्न ‘जैसे थे’ होता. याच प्रश्नावर आ. तनपुरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आवाज उठवत शासनाकडून ग्रामीण रुग्णालयासाठी निधी आणण्याचा शब्द दिला.

राहुरी शहरातील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख यांसह सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत याबाबत प्रशासनाला निवेदन दिले होते.

दरम्यान, आ. तनपुरे यांच्या आमदारकीचे फलित म्हणून बसस्थानकानंतर ग्रामिण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागत असल्याच्या प्रतिक्रिया राहुरीकरांच्या चर्चेतून व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe