Ahmednagar News : विषारी गवत खाल्ल्याने शेतकऱ्याच्या पाच गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथे घडली आहे. यामुळे संजय दत्तात्रय गोंदकर या शेतकऱ्याचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कुंद्रा गस गावत खाल्यामुळे हि घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील शेतकरी गोंदकर यांच्या गोठ्यात आठ गाई, दोन बैल अशी जनावरे होती. या सर्वांना त्यांनी कुंद्रा या प्रकारचे गवत खाऊ घातले. त्यातील असणाऱ्या नायट्रेटच्या अति प्रमाणामुळे रात्री ११ वाजता जनावरांना त्रास जाणवू लागला.

जनावरे चक्कर येऊन खाली पडू लागली त्यांनी लगेच खाजगी पशुवैद्यकीय डॉ. सुपेकर, डॉ. कोळगे व डॉ. तांबे यांना बोलावून उपचार केला. या सर्वानी या जनावरांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले परंतु यात गोंदकर कुटुंबाच्या पाच गायींना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
सकाळी केलवड येथील शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गहिनीनाथ एनगे यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी हजर होऊन डॉक्टर कोळपे यांना बोलावून सदर मृत झालेल्या पाच गाईंचा पंचनामा केला.
मृत गायींचे पोटातील खाद्याचे, चाऱ्याचे व हृदय, यकृताची नमुने घेऊन पुढील तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. सध्या तरी गाईंचा मृत्यू हा कुंद्रा गवत खाल्ल्याने झाला असल्याचे प्राथमिक अंदाजात बोलले जात असले तरी रिपोर्ट आल्यानंतरच या गायीचा मृत्यू नेमका कशाने झाला याचे कारण स्पष्ट होईल.
सदर कुटुंबाच्या झालेल्या आर्थिक नुकसान भरपाईसाठी पशु विभागामार्फत अकस्मात मृत्यू झालेल्या पाच गाईंचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येईल तसेच या कुटुंबासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी पशु विभागामार्फत सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येतील असे सांगण्यात आले.
या कुटुंबाचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसायावर अवलंबून होता. दुभत्या पाच गायी दगावल्याने या कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
सध्या सर्वत्र पाऊस पदत आहे, त्यामुळे शेतात, बांधावर मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारचे गवत उगवले आहे. मात्र यातील कुंद्रा, ढोलआंबा, काटेमाट या गवतामध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते.
अधिक दिवस या गवतावर सूर्यप्रकाश न पडल्यास त्याचे प्रमाण आणखी वाढते. या प्रकारचे गवत जनावरांना जास्त प्रमाणात घातल्यास जनावरांची श्वसन संस्था बंद होते. रक्त घट्ट होते, जनावरांना धाप लागणे, तोंडावाटे जाड लाळेचा श्राव होणे, पोट फुगणे, अंगावर काटा येणे, ताप येणे अशा प्रकारची लक्षणे आढळतात.
यामध्ये वेळेत उपचार न मिळाल्यास जनावरे जास्तीत जास्त एक तासाच्या आत मृत्युमुखी पडतात. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घावी.