Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील आरोपी वसंत लक्ष्मण शिंदे (वय ५२ वर्षे) याला पत्नीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून त्याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी, की या घटनेतील मयत अलकाबाई या त्यांचे पती वसंत लक्ष्मण शिंदे याच्यासह राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे राहात होत्या. त्यांच्या शेजारी त्यांची मुलगी बाली काळू निकम ही राहात होती. आरोपी वसंत शिंदे हा पत्नी अलकाबाई यांना नेहमीच दारू पिऊन मारहाण करत असे.

या बाबत अलकाबाई यांनी त्यांची मुलगी बाली यांना सर्व हकिगत सांगीतली होती. दि. १९ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास वसंत शिंदे मुलगी बाली यांच्या घरी गेला व म्हणाला की, “तुझी आई मुलांकडे बांगर्डे येथे राहायला जायचे म्हणत होती; परंतु मी तिला जाऊ दिले नाही.
आमची दोन तीन दिवसांपासून भांडणे चालू आहेत. मी तिला त्या कारणामुळे मारहाण केली. त्या मारहाणीत तिला कपाळाला, डोक्याला व छातीला मार लागलेला आहे. तेव्हापासून ती उठत नाही. जेवण करीत नाही. तु तेथे जाऊन बघ.” असे सांगून आरोपी निघून गेला. तेव्हा मुलगी बाली निकम यांनी आई-वडील राहात असलेल्या कोपीत जाऊन पाहिले. अलकाबाई या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या दिसल्या.
बाली निकम यांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या उठल्या नाहीत. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलगी बाली काळू निकम यांच्या फिर्यादीवरून आरोपी वसंत लक्ष्मण शिंदे याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून अहमदनगर येथील न्यायालयात दोषारोप पत्र पाठविले. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. सहारे यांच्या समोर चालला. सरकारच्या वतीने ८ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यात मयताचा मृत्यू हा आरोपीच्या ताब्यात असताना झाला, तसेच आरोपीकडून रक्ताने भरलेले कपडे पुरावा म्हणून जप्त केले होते.
तो पुरावा तसेच रासायनिक अहवाल, मयताने मृत्यूपूर्वी त्यांच्या मुलीला सांगितलेली घटना, या गोष्टी ग्राह्य धरण्यात आल्या. तसेच फिर्यादी, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी तसेच तपासी अंमलदार उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.
या प्रकरणात तपासी अधिकारी धाकराव यांना हवालदार विकास साळवे, रोहित पालवे व योगेश वाघ यांनी मदत केली. सरकारी वकिलांना सहाय्यक फौजदार विलास साठे यांनी सहकार्य केले.