सोशल मीडियावर पाच दिवसाची ओळख, अन विद्यार्थिनीने ‘त्या’ला थेट शाळेत बोलावले.. शिक्षकांच्या सतर्कतेने मोठी घटना टळली..

सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. या सोशलमिडीयावर अनेक चांगल्या गोष्टी घडतात तर अनेक समाजविघातक घटना देखील याच सोशल मीडियाच्या माध्यमातून घडतात.

Published on -

Ahmednagar News : सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. या सोशलमिडीयावर अनेक चांगल्या गोष्टी घडतात तर अनेक समाजविघातक घटना देखील याच सोशल मीडियाच्या माध्यमातून घडतात.

अलीकडील काळात मुलींच्या फसवणुकीच्या व त्यातून अत्याचाराच्या घटनाही याच सोशल मीडियातून होताना दिसतात. आता अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत कुठलाही परिचय नसताना दोघांची इंस्टाग्रामवर ओळख झाली.

अवघ्या पाच दिवसात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मोबाईलवर विद्यालयाचे लोकेशन टाकले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ८० किलोमीटर अंतराहून विद्यालयात हजर होऊन धूमस्टाईलने विद्यार्थिनीला पळवून घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सतर्कतेने हीरो व विद्यार्थिनी जाळ्यात अडकली. श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील ही घटना घडली.

स्टँडवर ऐटीत मोटारसायकल लावून पांढरा टी-शर्ट, पाठीवर बॅग लटकवलेल्या तरुणाने शाळेच्या व्हरांड्यात प्रवेश केला. मुख्याध्यापक बाहेरच उभे होते. त्या ‘हीरो’कडे पाहत होते. ‘हीरो’ने दहावीत शिकणाऱ्या मुलीचे नाव सांगून,

‘मी तिच्या आत्याचा मुलगा आहे, तिला घेण्यासाठी आलो आहे. तिला तिच्या घरी घेऊन जायचे आहे,’ असे सांगितले. विद्यार्थिनीला निरोप दिला. तीही जणू तयारीतच असल्यासारखी पाठीवर बॅग लटकावून वर्गाबाहेर आली. दोघांनी एकमेकांना पाहिलेले नसल्याने गडबड होऊ नये म्हणून हीरो लगबगीने विद्यार्थिनीजवळ गेला.

तेवढ्यात शिक्षक वर्गाबाहेर आले आणि मुख्याध्यापकांच्या जवळ उभे राहिले. त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने त्या विद्यार्थिनीच्या घरी मोबाईलवरून संपर्क साधला. मात्र ‘आम्ही कुणा भाच्याला पाठवले नाही. आणि आम्हाला भाचाही नाही,’ असे विद्यार्थिनीच्या घरून सांगण्यात आले.

त्यामुळे काय सुरू असावे, याचा अंदाज शिक्षकांना आला आणि त्यांनी तातडीने हीरोला रोखण्याचा निर्णय घेतला. तो तरुण विद्याथिनीसह मोटारसायकलकडे धाव घेण्याच्या तयारीत असतानाच सेवक टी. ई. चौधरी यांनी त्याची कॉलर पकडली.

अन्य शिक्षकांच्या मदतीने त्याला ओढत कार्यालयात आणले. विद्यार्थिनीचे नातेवाईकही अवघ्या वीस मिनिटांत शाळेत हजर झाले अन पुढील मोठा अनर्थ टळला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe