राज्यातील काही भागांत शनिवारी जोरदार सरी पडल्या. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता, तर अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. दरम्यान, राज्याच्या काही भागांत पावसाचा जोर कमी-अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत कार्यरत आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. कोकणातील बहुतांश भागांत शनिवारी पाऊस झाला. मुंबई येथे ४३ मिमी, सांताक्रुझ ६५ मिमी, डहाणू ११ मिमी, तर रत्नागिरी येथे २ मिमी पाऊस पडला.
मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे ५१ मिमी, नाशिक १५ मिमी तसेच पुणे, जळगाव, कोल्हापूर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर येथे पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे २ मिमी, तर विदर्भातील अकोला येथे २० मिमी, गोंदिया १३ मिमी, अमरावती १० मिमी तसेच चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
शनिवारी राज्यात सर्वात जास्त तापमान सोलापूर येथे नोंदवले गेले शनिवारी सोलापूराचे तापमान ३२.३ अंश सेल्सिअस इतके होते, तर महाबळेश्वर येथे किमान तापमान १८.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.
पालघर, पुणे, सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट
भारतीय हवामान विभागाने पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना रविवार, ४ ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग आणि नाशिकसाठीही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पालघरमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा येथे घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.