महावितरण कंपनीची वीज हारेवाडीडून बाभळेश्वरकडे मोठ-मोठे टॉवर उभे करुन नेण्याचे काम चालु असताना लोहसर, पवळवाडी शिवारात तिन महाकाय टॉवर कोसळले होते.
या टॉवरचे काम पुन्हा आमच्या शेतात करु नये, या टॉवर व तारांमुळे आमच्या जीविकास धोका निर्माण झाला असून, या परिसरातील शेतकऱ्यांनी पुन्हा टॉवर उभे करण्यास व तारा ओढण्यास विरोध दर्शवत या लाईनचे काम बंद पाडले असून, वेळप्रसंगी या कंपनीच्या विरोधात आमरण उपोषणास बसण्याचा इशारादेखील संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे.
महावितरणची वीज हारेवाडीकडून बाभळेश्वर येथे टॉवरव्दारे नेण्याचे काम चालु असतानाच पाथर्डी तालुक्यातील लोहसर, पवळवाडी शिवारात उभे केलेले तिन टॉवर निकृष्ट कामामुळे मागील आठवड्यात कोसळुन या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
पडलेले टॉवर पुन्हा उभे करण्यासाठी आलेले कर्मचारी व मजुरांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या टॉवरचे काम आता पुन्हा करु नका अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा देत टॉवर उभारणीचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे.
ठेकेदाराने निकृष्ट काम केल्यामुळे हे टॉवर पडले असुन, या टॉवरवरील तारांमुळे आमच्या फळबागांसह बाजरी, तुर, कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आमची झालेली नुकसान भरपाई संबंधित ठेकेदार व महावितरण कंपनीने न दिल्यास या भागातील शेतकरी उपोषणास बसणार असल्याचा इशारा विकास डोंगरे, नवनाथ सोपान गिते, मारुती निवृत्ती गिते, मिठु तात्याबा गितेसह अनेक शेतकऱ्यांनी दिला आहे.
मराठवाडीकडून बाभळेश्वरकडे जात असलेल्या २२० के व्ही लाईनच्या कामांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत धनदांडग्यांनी हात ओले करून घेतल्याची देखील चर्चा असून, गोरगरीब शेतकऱ्यांना मात्र केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचे काम मुख्य ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून केले जात असल्याची देखील संतप्त प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.