राज्य शासन लोकाभिमुख काम करत आहे. शिर्डी एमआयडीसीत संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या कारखान्यास शासनाने मंजुरी दिली असून या कारखान्याच्या माध्यमातून शिर्डी व राहाता परिसरातील २ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
महसूल पंधरवडा निमित्त राहाता येथे विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभांचे महसूलमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिर्डीचे प्रांताधिकारी माणिकराव आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, राहाता तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब जेजुरकर, मुकुंदराव सदाफळ आदी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक अर्थसहाय्यातील संजय गांधी निराधार अनुदान, इंदिरा गांधी, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन, आदिवासी शासकीय प्रमाणपत्र व शिधापत्रिकेचा प्रत्येकी पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे महसूलमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कृषी विभागाच्या ११ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी पोलीस विभागात शासन नियुक्ती मिळालेले स्थानिक युवतींचा व सीए परीक्षा पास झालेल्या युवकाचा महसूलमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले की, एका सप्ताहात योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचू शकत नाही म्हणून महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पशुसंवर्धन पंधरवडा ही साजरा करण्यात येत आहे. या महसूल पंधरवड्यात महसूली दाखल्याचे सर्वसमान्याना प्रभावीपणे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १८९ तलाठ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
अत्यंत पारदर्शक पद्धतीत ही भरती प्रक्रिया पार पडली. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत राहाता तालुक्यात ५४ हजार अर्ज भरण्यात आले. मुख्यमंत्री बळीराजा योजनेत शेतकऱ्यांचे शंभर टक्के वीज बील माफ करण्यात आले. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय शासनाने घेतला.
राहाता तालुक्यातील या मेळाव्यात सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनेत ८१३ लाभार्थ्यांना व कृषी विभागाच्या १२०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. तालुक्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ७६ कोटी ३३ लाखांचा आरोग्य लाभ वितरित करण्यात आला.
१७ हजार २६३ शेतकऱ्यांच्या खात्यात ९ कोटी ४४ लाखांचे दूध अनुदान देण्यात आले. ४४ हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला. निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या कामास जिल्ह्यात सुरूवात आली. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज या मेळाव्यात भरण्यात आले. या योजनेची गटविकास अधिकारी पठारे यांनी माहिती दिली.