एका कंपनीच्या केबलचे काम करणारे ३ मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने यातील एकजण गुदमरून ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमीपैकी एका मजुरास राहुरी, तर दुसऱ्या मजुरास नगर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
मातीचा ढिगारा कोसळत असताना इतर केबल कंपनीचे २ मजूर खड्यातून बाहेर पळाल्याने ते बचावले. रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास नगर-मनमाड राज्य महामार्गावरील राहुरी हद्दीत असलेल्या विष्णूपंत गिते यांच्या स्वराज ट्रॅक्टर शोरूम जवळ चंद्रभान ही घटना घडली. प्रदीप भोसले, वय २७, रा. गळलिंब असे मृत मजुराचे नाव आहे.
गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी शनिवारी दुपारी कंपनीकडून घटनास्थळी १० फुटापेक्षा जास्त खोल खड्डा खणून ठेवण्यात आला होता. जेसीबीने खड्डा खोदल्याने तूटफूट झालेल्या केबलच्या जोडणीसाठी एक मोबाईल कंपनी व इतर केबल कंपनीचे मजुराकडून रविवारी रात्री वेळेत काम सुरू होते.
पाईपलाईनसाठी खोदलेला खड्डा नगर-मनमाड राज्य महामार्गालगत असल्याने अवजड वाहनाच्या हादऱ्याने मातीचा ढिगारा कोसळून तीन मजूर त्याखाली दबले गेले. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्यास मदतकार्य केले.
या घटनेत प्रदीप चंद्रभान भोसले, वय २७, रा. गळलिंब हा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेला मजूर जागीच ठार झाला. आकाश सुरेश देवढे जखमीस नगर येथील खासगी दवाखान्यात तर दत्तात्रय जालिंदर चितळकर, रा. चिंचाळे, ता. राहुरी याला राहुरीतील खासगी दवाखान्यात हलवण्यात आले.
सोमवारी दुपारी राहुरी येथे शवविच्छेदनानंतर प्रदीप भोसले या मजूराचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. मातीच्या ढिगाऱ्याखाली मजूर गाडले गेल्याची गंभीर घटना घडून देखील गॅस कंपनीचे व्यवस्थापन तसेच केबल कंपनीचे ठेकेदार सोमवारी सकाळपर्यंत घटनास्थळी फिरकले नाही.
रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेची खबर राहुरी पोलीसांना तात्काळ देण्यात आली. मात्र सोमवारी सकाळी १० वाजता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या घटनमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.