आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरणार आहे. विधानसभेसाठी आघाडीतील जागावाटप प्राथमिकदृष्ट्या निश्चित झाले असून, शिवसेना ठाकरे गट ११०, काँग्रेस १०० तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची ७० जागांवर सहमती झाल्याची माहिती आहे.
उर्वरित जागा समाजवादी, शेकाप, डावे अशा समविचारी मित्रपक्षांना सोडल्या जाणार आहेत. उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, इंडिया आघाडीच्या बैठकीत या फॉम्यूल्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे.
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळवारपासून सध्या तीनदिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांच्यासमवेत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हेसुद्धा आहेत. या दौऱ्यात ठाकरे हे सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह समाजवादी, तृणमूल, आम आदमी पक्षासह ‘इंडिया’ आघाडीतील प्रमुख नेत्यांशी भेट घेऊन चर्चा करणार आहेत. लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्लीत गेले आहेत.
यावेळी ठाकरे राज्यातील विधानसभा निवडणुकीचा ‘रोडमॅप’ काँग्रेससह इंडिया आघाडीच्या नेत्यांपुढे ठेवणार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीत सर्वात कळीचा मुद्दा जागावाटपाचा आहे. मात्र, त्यातून सहज मार्ग निघणार असल्याची माहिती आहे.
भाजपचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट व पुरोगामी विचारसरणीच्या मित्रपक्षांसोबत आघाडी करून लढावे. जागावाटपात एक पाऊल मागे यावे लागले तरी चालेल, पण महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आले पाहिजे, अशा सूचना राहुल गांधी यांनी प्रदेश काँग्रेस नेत्यांना दिल्या आहेत.
शरद पवार यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची हवा काढण्यासाठी एक पाऊल मागे येण्याची तयारी दाखवली आहे. जिंकू शकेल त्या पक्षाला जागा व जिंकणारा उमेदवार या निकषावरच आघाडीतील जागावाटप केले जाणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गट आघाडीत मोठा भाऊ ठरणार आहे.
ठाकरे गटाला ११०, काँग्रेसला १०० तर राष्ट्रवादीला ७० तर डाव्या विचारांच्या विविध पक्षांना उर्वरित ८ जागा असा फॉर्म्यूला तयार करण्यात आला आहे. या फॉम्यूल्यावर उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यात शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरूनही होणार काथ्याकूट
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावा किवा देऊ नये, याबाबत दिल्लीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत चर्चा होणार आहे. सध्या तरी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करून निवडणुकीला सामोरे जाऊ नये, त्याचा महाविकास आघाडीला काहीअंशी फटका बसेल, अशी भूमिका काँग्रेससह शरद पवारांची असल्याचे कळते.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून ज्या प्रकारे खाली खेचले गेले, त्यामुळे ठाकरेंचा चेहरा जाहीर केल्यास त्यांना असलेल्या सहानुभूतीचा किती आणि कसा फायदा होऊ शकेल, यावरही या बैठकीत काथ्याकूट केला जाणार आहे. याशिवाय, आघाडीतील कोणत्याही पक्षाला कितीही जागा मिळाल्या तरी पहिली अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून भाजपला शह देण्याच्या रणनीतीवरही चर्चा झाली.
महायुतीत भाजप १६० जागा लढणार?
विधानसभेसाठी महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात असले तरी महायुतीत मात्र म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. असे असले तरी भाजपनेसुद्धा आता महायुतीत लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप महायुतीत १५५ ते १६० जागा लढेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या पक्षातील आमदारांना, नेत्यांना सांगत आहेत. शिवसेना (शिंदे) ७० ते ७५ तर राष्ट्रवादी (अजित पवार) ५५ ते ६० जागा मिळतील, असे सांगितले जाते. राज्यात वेगवेगळ्या छोट्या पक्षांची, संघटनांची तिसरी आघाडी तयार करून महाविकास आघाडीच्या मतांत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.