मॉडेलिंगच्या नावाखाली आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ काढत तरुणीवर अत्याचार !

Published on -

भांडुपमधील १९ वर्षीय तरुणीला मॉडेल बनवण्याचे आमिष दाखवून मॉडेलिंगच्या नावाखाली अश्लील आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ काढत तरुणीला ब्लॅकमेल करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४५ लाखांचा ऐवज घेतल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करून भांडुप पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

भांडुपमध्ये कुटुंबासोबत राहत असलेली १९ वर्षीय तरुणी एका नामांकित कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस तिच्या इन्स्टाग्रामवर हार्दिक नावाच्या व्यक्तीचा मॉडलिंगमध्ये करिअर करण्यासाठी सुवर्णसंधी असल्यासंदर्भात मेसेज आला. तरुणीने ते खाते तपासले असता मॉडेलिंग इंडस्ट्रिजमध्ये नावाजलेल्या धर्मा प्रोडक्शन कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे तिला दिसले.

मॉडेलिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याने तरुणीने त्याला होकार दिला. हार्दिकने तिला राहुल चव्हाण नावाच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर देत संपर्क करण्यास सांगितले. तरुणीने चव्हाणशी संपर्क साधला असता त्याने नोंदणीसाठी २० हजार रुपये घेतले. चव्हाणने तिला वांद्रे येथील एका हुक्का पार्लरमध्ये भेटायला बोलावले. तरुणी तेथे गेल्यावर त्याने प्रोफाईल, पोर्टफिलिओ बनवण्यासाठी आणखी २० हजार रुपये घेतले.

चव्हाण हा तिला कॉल करून भूलथापा देत भेटण्यास बोलावून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने एका ब्रँडचे शूटिंग करून १० लाख रुपये मिळतील, असे सांगत एक लाख रुपयांची मागणी केली. वडिलांकडून एवढी रक्कम मिळणार नसल्याने तरुणीने चव्हाणला घरातील दागिने नेऊन दिले.

मॉडेलिंगचे काम देण्याचे आमिष दाखवून चव्हाण हा तरुणीकडून दागिने घेऊ लागला. तसेच त्याने तरुणीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. चव्हाण याने शारीरिक संबंधांचे फोटो व व्हिडीओ काढले. तर, हार्दिकने तिला नग्न फोटो काढून पाठवण्यास भाग पाडले.

मॉडेलिंगचे काम मिळत नसल्याने तरुणीने त्याला आणखी पैसे आणि दागिने देण्यास नकार दिला. त्यांनी तरुणीला आणि तिच्या वडिलांना बदनामी करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपींनी तरुणी आणि तिच्या वडिलांकडून रोख रक्कम आणि दागिने असा एकूण ४५ लाखांचा ऐवज उकळला.

अखेर तरुणीने आई-वडिलांना सोबत घेऊन भांडुप पोलीस ठाण्यात जात राहुल चव्हाण, श्रेयस पाटील आणि हार्दिक यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीची तक्रार दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News