श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अनिल औताडे यांचा मुलगा संग्राम औताडे नुकताच एमपीएससी परीक्षेत ३७वी रॅक घेऊन उत्तीर्ण झाला असून त्याची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरीपुत्र पीएसआय झाल्याने माळेवाडी ग्रामस्थांनी संग्राम औताडे यांची नुकतीच मिरवणूक काढली.
आयुष्यभर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढणारे अनिल औताडे यांनी वेळोवेळी केलेल्या आंदोलने, उपोषण केल्याने त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले; परंतु मुलाने कष्टाने आणि जिद्दीने अभ्यास करून अंगावर खाकी वर्दी घालून शेतकरी बापाचा स्वाभिमान, अभिमानही वाढवला आहे. पोरगा पीएसआय बनल्याने औताडे यांनी गावजेवण देऊन आपला आनंद व्यक्त केला. पोलीस अधिकारी झाल्यानंतर शेतकऱ्यांची लूट आणि शेतकऱ्यांवर होणारा अन्याय रोखण्याचा सल्ला त्यांनी लेकाला दिला आहे.

दूध दरवाढ, उसाची एफआरपी, पाणीप्रश्न अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढा देणारे शेतकरी कार्यकर्ते अनिल औताडे यांच्यापासूनच मुलगा संग्राम याने अधिकारी होण्याची प्रेरणा घेतली, तर अनिल औताडे यांनी शेतकरी नेते स्व. बबनराव काळे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याची ठरवले. पुढे त्यांनी नगर जिल्ह्यासह राज्यभरात विविध आंदोलने, उपोषणे करून शेतकरी प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. ते आजही सुरू आहे.
शेतकरी आंदोलने करताना वडील अनिल औताडे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात आजपर्यंत १० ते १२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात, न्यायालयात येणाऱ्या अडचणी पाहून मुलाने प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि पीएसआय होऊन सत्यात उतरवले आहे.
या यशासाठी त्याला मित्रांची साथ आणि मामा पशुवैद्यकीय अधिकारी लक्ष्मण धोंडे यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच लहान भाऊ डॉ. शुभम व चुलते सुनिल औताडे यांनी भक्कम साथ दिली. त्यामुळे पूर्ण वेळ अभ्यास करता आला आणि अधिकारी होणे शक्य झाल्याचे संग्राम यांनी सांगितले.
संग्राम यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण माळेवाडी येथील विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण ‘रयत’च्या बोरावके महाविद्यालयात झाले. त्यानंतर पुढे अभियांत्रिकी शिक्षणासाठी त्यांनी नाशिक गाठले. नाशिकमधील मातोश्री महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली.
यावरच समाधान न मानता वडिलांचा संघर्ष आणि शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ पाहून अधिकारी होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे ठरवले. त्यानंतर २०१६ पासून त्यांनी पुण्यात जाऊन मंगळवार पेठ येथील स्व-रूपवर्धिनी संस्थेत राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू केली. काही काळ तासिका तर काही वेळ स्वयंअध्ययन केले. प्रारंभी आलेल्या अपयशाला न जुमानता पुन्हा अभ्यास केला आणि अखेर राज्यसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक होऊन अंगावर खाकी वर्दी कमावली आहे. त्यामुळे त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संयम आणि सातत्य ठेवा कोणत्याही क्षेत्रात गेल्यास चढ-उतार असतातच मात्र संयम आणि सातत्य ठेवल्यास निश्चित यश मिळते. पीएसआय पदापर्यंत पोहोचण्यासाठी मागील साडेसहा वर्षापासून संघर्षमय प्रवास करावा लागला. यादरम्यान ३० ते ३५ वेळा राज्यसेवेची पूर्व परीक्षा दिली. १८ वेळा मुख्य परीक्षा दिल्या. तसेच दोन वेळा राज्यसेवेच्या मुलाखती दिल्या. प्रारंभी उपजिल्हाधिकारी पदासाठी शंभरपैकी ६२ गुण मिळाले; मात्र रिटर्न स्कोर कमी असल्याने अपयश आले. त्यानंतर पुन्हा तयारी केली आणि दुसऱ्या वेळी ३७वी रैंक पटकावून पीएसआय झालो असे संग्राम औताडे यांनी सांगितले.