हाथरस बलात्कार घटनेच्या निषेधार्थ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व आरोपींना पाठीशी घालणार्‍या उत्तर प्रदेशातील संबंधीत सर्वच खात्यातील अधिकार्‍यांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली. तर योगी व मोदी सरकारच्या विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करुन देशात महिलांवर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याचा आरोप करण्यात आला.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, शहराध्यक्ष गणेश चव्हाण, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जिल्हाध्यक्ष इमरान जहागीरदार, बाळासाहेब पातारे, नामदेव राळेभात, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत, शहराध्यक्ष शिवाजी भोसले, अविनाश देशमुख, सारंग घोडेस्वार, अमित हरिहर, सौरव बोरुडे, गणपतराव मोरे, संजय संसारे, राजाभाऊ भोरे, मनोहर वाघ, सुजाता पातारे, मोनिका सोनवणे,

प्रज्ञा बोरुडे, पौर्णिमा सोनवणे, नितू बेग, डॉ.प्रदीपकुमार चौदंते, नवनाथ खुपटे, दिनेश कलोसिया आदिंसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंदपा येथे राहणार्‍या दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. आपल्या आईसोबत तरुणी शेतात चारा गोळा करण्यासाठी गेली असता तिच्यावर चार नराधमांनी अत्याचार करून तिची जीभ कापून, पाठीच्या कण्याचे हाड मोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पीडित तरुणीला उपचारासाठी अलीगढच्या जेएन मेडिकल रुग्णालय व सफदरजंग रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना या पीडित तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळून देखील उत्तरप्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता. पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. तर पोलिसांनी पीडितेचा मृतदेहावर त्यांच्या नातेवाईकांना न सांगता गुपचूप त्यावर अंत्यसंस्कार करुन उत्तरप्रदेश सरकारने लोकशाही पायदली तुडवून हुकुमशाही निर्माण केली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

राजेंद्र करंदीकर म्हणीले की, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अमानुष घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. मोदी-योगी सरकारच्या रामराज्यात एका असहाय्य मुलीवर सामुहिक अत्याचार करुन, तिची निघृणपणे हत्या केली जाते. एवढा भयंकर गुन्हा घडल्यानंतरही जातीयवादी वृत्तीचे पुरस्कर्ते गुन्हेगारांना पाठीशी घालतात. एवढेच नव्हे तर, अधिकारी व पोलीस पुरावे नष्ट करुन, गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न करतात.

यावर कळस म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुग गिळुन गप्प आहे. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी गाय वाचवणे कर्तव्य समजत असून, तेथील मुलगी अद्यापही असुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश चव्हाण यांनी हाथरस येथील अत्याचाराची घटना म्हणजे जातीयवाद व विषमतेने समतेवर केलेला अत्याचार आहे. झुंडशाहीने लोकशाहीवर केलेला अत्याचार आहे, एवढेच नव्हे तर हा मनुस्मृतीने संविधानावर केलेला अत्याचार आहे.

हा अत्याचार जर रोखायचा असेल तर ही मनुवादी व्यवस्था बदलावी लागेल. त्यासाठी बहुजन समाजाला संघटित होऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे सांगितले. तसेच संजय संसारे, इमरान जहागीरदार, अविनाश देशमुख यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारवर निशाना साधला. सदर प्रकरणी पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांना न्याय न मिळाल्यास 15 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, 22 ऑक्टोबरला उत्तरप्रदेश बंदची हाक तर 30 ऑक्टोबरला देशव्यापी जेलभरो आंदोलनाचा इशारा बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment