सध्या सर्वत्र महिलांची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरण्याची लगबग सुरु आहे. येत्या १९ तारखेला या महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार आहेत. सध्या लाखो अर्ज प्राप्त झाले आहेत.
परंतु या काही दिवसात लाडकी बहीणचा अर्ज नामंजूर झाल्याचा मॅसेज अनेक महिलांना येतोय. छाननी प्रकियेत अर्ज अपूर्ण भरणे, त्रुटी असणे या कारणाने सरासरी ६ ते ८ टक्के महिलांचे अर्ज अंशतः आणि तात्पुरते नामंजूर करण्यात आले असल्याची चर्चा आहे.
या सदरच्या महिलांनी नाउमेद होऊ नये. नामंजूर अर्जातील त्रुटी दूर करून पुन्हा तो अर्ज भरावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लाखो महिलांनी यासाठी अर्ज केलेले असून सदरच्या अर्जाची छाननी प्रक्रिया शासनाकडून सुरू झाली असून,
ज्यांचे अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह दाखल करण्यात आले. त्यांना लाभार्थी म्हणून संदेश प्राप्त झाले. मात्र, काही महिलांना काही कारणास्तव अर्ज नामंजूर झाल्याचा संदेश मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.
दरम्यान, अनेक महिलांनी अंगणवाडी सेविकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांकडे व्यथा मांडली. दरम्यान, याबाबत प्रशासनाने सांगितले की, शासकीय निकषानुसार पात्र असणारी एकही महिला योजनेपासून वंचित राहणार नाही. अर्ज छाननी प्रक्रियेत ज्या लाभार्थ्यांनी संपूर्ण अर्ज भरलेला नाही, कागदपत्र अपूर्ण आहेत,
आधार कार्ड किंवा बैंक पासबुक नावात बदल असणे किंवा हमीपत्रावर अर्धवट स्वाक्षरी आदी कारणांमुळे अर्ज नामंजूर झाल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र त्रुटी निघालेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची संधी अर्जदारांना मिळणार असून, त्यावेळी सर्व योग्य माहिती अचूक भरून तो ऑनलाइन सबमिट करावा, असे त्यांनी सांगितले.