पालखेड धरण ६५ टक्के भरले असून, जवळपास ७२३ क्युसेकने ओव्हर फ्लो चालू आहे. कोपरगाव मतदार संघातील पूर्व भागात पुरेसा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे बंधारे आणि पाझर तलाव भरलेले नाहीत.
त्यामुळे पालखेड अंतर्गत येणारे शिरसगाव, आपेगाव, गोधेगाव, घोयेगाव, उक्कडगाव, दहेगाव बोलका, सावळगाव, तिळवणी, लौकी, भोजडे, दुगलगाव या भागातील शेतकरी पाण्यासाठी त्रासले आहेत.
ओव्हर फ्लोच्या पाण्यातून बंधारे आणि तलाव भरले गेले, तर आगामी काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे तलाव भरून मिळावेत, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते विवेक कोल्हे यांनी केली आहे.
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी दूरदृष्टी ठेवत बंधारे बांधून सदर भाग जलयुक्त करण्याचे काम केले होते. शेती, पशुधन आणि पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन होण्यासाठी मोठी मदत यामुळे होते.
हे बंधारे आणि पाझर तलाव माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व बिपीन कोल्हे यांच्या माध्यमातून मागील कालखंडात भरून मिळाले होते. त्याचप्रमाणे आम्हाला या अतिरिक्त पाण्याचा लाभ मिळावा, ज्यातून दिलासा मिळेल अशी भावना नागरिक आणि शेतकरी यांची आहे.
संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमांतून बंधारे बांधून स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांनी जलसाठे निर्मितीची दिशा दिली. अल्प पर्जन्य झाले, तरी शेतकरी आणि नागरिक अडचणीत येऊ नये साठी धोरणात्मक कामे केली.
पालखेड कालव्याअंतर्गत येणारे बंधारे आणि पाझर तलाव ओव्हर फ्लो पाण्याने भरले जाणे आवश्यक असून, या मागणीवर तात्काळ सकारात्मक कार्यवाही व्हावी अन्यथा शेतकरी बांधवांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.