Maharashtra Rain : भारतीय हवामान खात्याने पावसाबाबतचा एक नवीन अंदाज वर्तवला आहे. या नवीन अंदाजानुसार पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. खरे तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा मान्सून हा मजबूत असल्याचे जाणवत आहे. मान्सूनच्या अगदी सुरुवातीलाच महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला असता जून महिन्यात पावसाचे प्रमाण थोडेसे कमी होते.
मात्र गेल्या वर्षाच्या मान्सूनसोबत तुलना केली तर यंदाच्या जून मध्ये देखील खूपच चांगला पाऊस झालाय. जुलै महिन्यात तर पावसाचा जोर खूपच वाढला होता. जून महिन्यात झालेल्या कमी पावसाची कसर जुलै महिन्यातून धरून निघाली असे आपण म्हणू शकतो.
जुलै महिन्यात काही ठिकाणी पूरस्थिती देखील तयार झाली होती. दरम्यान ऑगस्ट महिन्याची सुरुवातही चांगल्या जोरदार पावसाने झाली असून दोन दिवसांपासून पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने उद्यापासून पावसाचा जोर आणखी कमी होणार असे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून 2023 मध्ये जसा ऑगस्ट महिन्यात 15 ते 20 दिवसांचा पावसाचा खंड पडला होता तसाच खंड या चालू ऑगस्ट महिन्यात तर पडणार नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. दरम्यान याच संदर्भात भारतीय हवामान खात्याने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये ए टू झेड माहिती दिली आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा तसेच नंदुरबार वगळता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या संबंधीत जिल्ह्यात आज ठीकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड अन विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला देखील आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे सुद्धा काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असे आयएमडीने म्हटले आहे.
उद्यापासून मात्र पावसाचा जोर फारच कमी होण्याची शक्यता आहे. उद्या कोकणातील रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि विदर्भातील अमरावती, यवतमाळ अन वर्धा या जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते असा अंदाज आहे.
म्हणजेच उद्यापासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा विसावा असेल. पण, शनिवारपासून राज्याच्या विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार हे तीन दिवस विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर विदर्भातील अनेक जिल्ह्यांना या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र हे तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये दिला आहे.