Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. राज्याची सांस्कृतिक राजधानी शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही प्रसिद्ध आहे. आता या शहराला आयटी हब अशी नवी ओळख मिळाली आहे. पण, यासोबतच आता पुणे शहर वाहतूक कोंडीसाठी देखील कुख्यात बनू लागले आहे.
मात्र आता पुण्यातील ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण देखील एक रिंग रोड विकसित करणार आहे.
म्हणजेच शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन नवीन रिंग रोड तयार होणार आहेत. यातील राज्य रस्ते विकास महामंडळाच्या पुणे रिंग रोड संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे रिंग रोड प्रकल्पाचे भूसंपादनाचे काम कुठवर पोहोचले ? या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.
कुठवर पोहोचले भूसंपादनाचे काम
पुणे रिंग रोड हा 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रस्ता आहे. या प्रकल्पाचे दोन टप्पे आहेत. पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यात याचे काम होणार आहे. सध्या या प्रकल्पासाठी युद्धपातळीवर भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे. खरंतर या प्रकल्पासाठी 1700 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे.
36 गावांमधून जाणाऱ्या पश्चिमेकडील रिंग रोड साठी 692.66 हेक्टर जमिनीची गरज आहे आणि 43 गावांमधून जाणाऱ्या पूर्वेकडील रिंग रोड साठी १०५४ हेक्टर जमिनीची गरज आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत पश्चिम रिंग रोड साठी 598.20 हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे.
अर्थातच 35.43 हेक्टर जमिनीचे संपादन बाकी आहे. पूर्व भागातील रिंग रोड साठी आत्तापर्यंत 405 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून उर्वरित ६५० हेक्टर जमिनीच्या संपादनासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लक्षात घेता पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी पुढील महिन्यापर्यंत म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे भूसंपादन पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी दिले आहेत.
तसेच या प्रकल्पासाठी संपादित झालेले जमीन राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नावावर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आधी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी देखील असे आदेश दिले होते. या प्रकल्पासंदर्भात नुकतीच एक महत्त्वाची बैठक झाली होती.
याच बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी पश्चिम भागातील रिंग रोडचे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले असून पूर्वेकडील रिंग रोडच्या भूसंपादनाचे काम देखील सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा असे आदेश विभागीय आयुक्तांना दिले आहेत.