Ahmednagar News : सध्या पावसाळा सुरु आहे. बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. परंतु जिल्ह्यातील असाही काही भाग आहे जेथे अद्यापही पावसाअभावी पाणी टंचाई आहे.
जिल्ह्यात ३१ गावे आणि १५३ वाड्यावस्त्यांमध्ये टँकर सुरु आहेत. सुमारे ५५ हजार नागरिकांची टँकरच्या पाण्यावर तहान सध्या भागवली जात आहे. आजमितीस २५ टँकर धावत असून, यामध्ये सर्वाधिक संगमनेर तालुक्यातील १४ टँकरचा समावेश आहे.
संगमनेर तालुक्यात सरासरी २७२.७ मि.मी. म्हणजे ७७,६ टक्के पाऊस झाला. पठारी भागात मात्र अद्याप भूजलपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे या तालुक्यातील २० गावे आणि ६२ वाड्यांतील जवळपास २५ हजार लोकसंख्येला १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
पाथर्डी तालुक्यातील काही गावांत नोव्हेंबर महिन्यामध्येच पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. त्यानंतर दिवसेंदिवस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू लागली. एप्रिल महिन्यापासून टंचाईग्रस्त गावांची संख्या झपाट्याने बाढली.
१५ जूनपर्यंत जिल्ह्यात साडेतीनशे टँकर धावत होते. जिल्ह्यात सरासरी ७७ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे.
मात्र ३१ गावांतील भूजल पातळीत बदल झाला नाही. त्यामुळे या गावांतील जनतेला टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. यासोबतच नेवासे, पारनेर, श्रीगोंदे तालुक्यांत टँकर सुरू आहेत.
कोणत्या गावात किती टँकर?
संगमनेर : २० गावे, ६२ वाड्या : १४ टँकर, पारनेर : ६ गावे, ६९ वाड्या : ६ टँकर, कोपरगाव : २ गावे, १६ वाड्या : २ टँकर, नेवासा : २ गावे, ७ वाड्या : १ टँकर, श्रीगोंदा : १ गाव : २ टँकर
सध्या या गावांतील जनतेला टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.