Ahmednagar News : नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपआवारात कांद्याच्या भावामध्ये शनिवारी (दि.१०) प्रतिक्विंटल तीनशे ते चारशे रुपयांची वाढ झाली. कांद्याला कमाल भाव ३ हजार ६०० रुपये मिळाला.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारी कांद्याची ४३ हजार १६९ गोण्या आवक झाली. एक-दोन लॉटला ३५०० ते ३६०० रुपयांचा भाव मिळाला.

मोठ्या कांद्याला ३२०० ते ३३०० रुपये, मुक्कल भारी ३००० ते ३२०० रुपये, गोल्टा २९०० ते ३००० रुपये, गोल्टी २५०० ते २८०० रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला १००० ते २४०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.
सरासरी क्विंटलला ३ हजार १०० ते ३,४०० रुपये भाव मिळाला. घोडेगाव येथील उपबाजाराच्या आवारात मागील आठवड्याच्या तुलनेने शनिवार झालेल्या लिलावात तीनशे ते चारशे रुपयांनी भावात वाढ झाली.
विशेष म्हणजे, एक नंबर कांद्यापेक्षा लहान कांद्याला जास्तीचा भाव मिळाला. शनिवारी आवारात एकूण ४३ हजार २६९ कांदा गोण्यांची आवक झाली होती. सध्या भाववाढ होऊ लागल्याने सलग दोन वर्षे अडचणीत सापडलेला कांदा उत्पादक शेतकऱ्याला समाधानकारक भाव मिळत आहे.
निर्यातबंदी नंतर कांद्याचे भाव फार कमी झाले होते. त्यामुळे कांद्याच्या कमी भावामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांत रोष व्यक्त होत होता. त्याचा फटकाही त्यांना निवडणुकांत बसला.
परंतु आता कांद्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे कांद्याला साधारण ३३०० ते ३६०० रुपयांपर्यंत भाव गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. शेतकरी माल मार्केटमध्ये आणत आहेत.