Ahmednagar Politics : अकोले तालुक्यातील पाणी, आरोग्य यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी मी आमदारकी मागतोय. मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे.
जनतेच्या पाठबळावर आमदारकीसाठी तुमच्यासमोर येतोय. मला तुम्ही साथ द्या, पक्षाकडून उमेदवारी मिळो, अगर न मिळो, प्रसंगी पक्ष कोणताही असो आपण माझ्यासोबत राहाल, अशी खात्री आहे
म्हणून मी आमदारकीसाठी पुन्हा येतोय, असे सांगत माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आमदारकीसाठी दंड थोपटले आहेत. अकोले येथील श्रीमंत लॉन्स येथे अकोले शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, समर्थक कार्यकर्ते, नागरिक यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात ते बोलत होते. पिचड म्हणाले, की राज्यात महायुतीचे सरकार आहे. उमेदवारीसाठी अकोलेतील जागेचा निर्णय अद्याप झाला नाही.
जागा कोणाकडेही असो, पक्षाकडून उमेदवारी मिळो, अगर न मिळो. पण मी आमदारकीसाठी पुन्हा येतोय. पक्ष, चिन्ह कोणते असेल काय असेल, ते पाहू पण तुम्ही माझ्यामागे उभे राहा असे आवाहन त्यांनी केले.
हो, मला आमदार व्हायचे आहे
आढळा व मुळा परिसरात ज्यादा पाणी उपलब्ध करून द्यायचे आहे. रस्ते, आरोग्य, पर्यटन विकासाची कामे करायची आहे. नवीन शैक्षणिक सुविधा निर्माण करायची आहे. यासाठी मला आमदार व्हायचे आहे असा विश्वास माजी आमदार वैभवराव पिचड यांनी बोलून दाखविला.
लहामटे यांच्यावर टीका
ज्यांना कधी बंधारा बांधता आला नाही, कुठे पाणी अडवले नाही आणि चाळीस वर्षांत पिचड यांनी काहीच केले नाही, असे खोटे सांगून २०१९ ला निवडून आले.
तेच आता मधुकरराव पिचड यांनी बांधलेल्या धरणांचे जलपूजन करत आहे, असा टोला माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आमदार डॉ. किरण लहामटे यांना लगावला.