Ahmednagar News : अहमदनगरमधून पोलीस वर्तुळात खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने पोलिस ठाण्यातच औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे.
भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. पोलिस कर्मचारी प्रवीण जगताप असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. शनिवारी रात्री उशिराने घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

जगताप यांनी अचानक विष प्राशान केल्याने पोलिस ठाण्यात काही काळ गोंधळ उडाला. इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ जगताप यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी विषारी औषध का सेवन केले याचे कारण समजू शकले नाही.
जगताप हे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहे. शनिवारी नाईट ड्युटी असल्याने ते ठाण्यात आले होते. ड्युटीवर असतानाच त्यांनी अचानक विषारी औषध सेवन केले
. ही बाब उपस्थित सहकारी कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी जगताप यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीसउपअधीक्षक अमोल भारती, सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी रूग्णालयात धाव घेतली.
जगताप यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. आर्थिक व्यवहारातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
यासंदर्भात कॅम्प पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजगुरू यांनी सांगितले.