Ahmednagar Politics : विधानसभेच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आजी माजी आमदार हे तर रिंगणात आहेतच शिवाय यावेळी इतरही इच्छुकांची मांदियाळी आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मतदार संघ असे आहेत की येथे इच्छुकांची संख्या भरमसाठ आहे. त्यामुळे निवडणुका चौरंगी होतील का अशी शंका यायला लागलीये. असाच एक मतदार संघ म्हणजे श्रीगोंदे.

येथे सध्या भाजपचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. १९८० साली प्रथम अपक्ष आमदार झालेले पाचपुते सातव्यांदा श्रीगोंद्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. ९ वेळा विधानसभेची निवडणूक लढवून ७ वेळा पाचपुते यांनी विजयी गुलाल घेतला.
प्रकृतीमुळे आ. बबनराव पाचपुते यांच्यावर काही बंधने आली, मात्र पत्नी प्रतीभा आणि मुलगा विक्रम, प्रतापसिंह यांनी ती भरून काढल्याचे दिसत आहे. पाचपुते कुटुंबियांनी राजकीय मैदानात उतरत भाजपातील नव्या- जुन्या निष्ठावंतांशी संवाद साधल्याने पक्षांतर्गत मरगळ झटकून पाचपुते समर्थकांमध्ये नवचैतन्य पसरल्याचे चित्र आहे.
परंतु हे सगळं होत असतानाच आता भाजपमधूनच इतर काही नेत्यांनी भाजपमधीलच इतर काही नेत्यांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे आ. पाचपुते यांची उमेद्वारीच आता धोक्यात येतेय का असे चित्र निर्माण झाले आहे.
श्रीगोंदा मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या उभ्या राहण्याच्या चर्चा सुरु असतानाच आता दुसऱ्या एका भाजप नेत्याने शड्डू ठोकला आहे. भाजपमधूनच सुवर्णा पाचपुते यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली असून गेल्या वर्षांपासून श्रीगोंदा मतदार संघात जनसंपर्क करत आहेत.
सुवर्णा पाचपुते यांनी म्हटलंय की, मागील विधानसभा निवडणुकीतच तयारी केली होती. परंतु पक्षातील वरिष्ठांनी सांगितल्याने आपण थांबलो. बाहेरच्या पक्षातून भाजपात एंट्री झाली व अशा लोकांना उमेदवारी देत पक्षाने आपल्याला थांबायला सांगितले.
परंतु यामुळे जे मुळ भाजपमधील आहेत त्यांच्यात नाराजी निर्माण झाली. परंतु यंदा मात्र सर्वच वरिष्ठ नेते आपल्याबरोबर आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे सर्व कार्यकर्ते आपल्याला उमेदवारीसाठी हट्ट करत असल्याचे सुवर्णा पाचपुते म्हणाल्या.
त्यामुळे आता शिवाजी कर्डीले, सुवर्णा पाचपुते असे भाजपमधूनच इच्छूक निर्माण झाल्यामुळे बबनराव पाचपुते यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे.