Ahmednagar News : एमआरपी पेक्षा जास्त दर घेणाऱ्या दारू विक्रेत्यास ५० हजाराचा दंड देशी दारूच्या बाटलीचे एमआरपी पेक्षा १० रुपये ज्यादा घेतल्याने सिन्नरच्या एका दारू विक्रेत्याला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या घटनेने सिन्नर तालुक्यातील दारू विक्रेत्यासह व्यापाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. कोणत्याही गोष्टीची कमाल किरकोळ किंमत (एम.आर.पी.) असते, दुकानदार देखील एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेऊ शकत नाही.

परंतु सिन्नर तालुक्यातील वंडागळी येथील शासकीय देशी दारू विक्रेत्याने एमआरपी पेक्षा १० रुपये जास्त घेतल्याचे सिद्ध झाल्याने नाशिक येथील जिल्हाधिकारी यांनी सदर दारू विक्रेत्यास ५० हजारांचा दंड ठोठावला आहे.
याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन येथील तालुका दारुबंदी अशासकीय माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते रमेश भोंगळ यांनी वंडागळी (ता. सिन्नर) येथील अनुन्यप्ती धारक सी.एल. ३ क्रमांक १०० या किरकोळ देशी विक्रेत्या विरोधात एमआरपी दरापेक्षा १० रुपये ज्यादा घेत असल्याबाबत
जिल्हाअधिकारी व अधिक्षक उत्पादन शुल्क, नाशिक यांच्याकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २ सटाणा यांनी (दि.९) मे २०२४ रोजी वरील परवानाधारक दारू दुकानास अचानक भेट देवून तक्रारदारासह निरीक्षण केले असता,
सदर ठिकाणी देशी दारूची सिलबंद बाटलीची किरकोळ कमाल किंमत ७० रुपये असताना ८० रुपयांने जास्त मद्यविक्री केली असल्याचे आढळून आले. त्यावेळी रंजित रामय्या विमला यांचा पंचासमक्ष जबाब नोंदविण्यात आला आहे.
त्यावेळी नोकरनामा सादर न करणे, पिण्याच्या पाण्याची बाटल व ग्लास विक्री करणे, छापील दरपत्रक न लावणे, आदीबाबी विसंगती आढळल्याने महाराष्ट्र देशी दारु नियमांचे उल्लंघन केल्याने रा.बा. खुळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांचा परवाना निंलबित अथवा रद्द का करण्यात येवू नये, याबाबत खळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता.
खुलाशात खुळे यांनी नमुद केले की, माझे अनुन्यप्ती मध्ये वरील प्रमाणे विसंगती आढळून आली असल्याने झालेली चुक मला मान्य असून भविष्यात यापुढे, अशी चुक होणार नाही, याची खात्री देवून सदर प्रकरण सामोपचार शुल्क आकारुन अनुन्यप्ती निलंबित अथवा रद्द करु नये, अशी विनंती केली.
सदर विसंगती प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या आदेशानुसार ५० हजार रुपये तडजोड शुल्क आकारुन दंडात्मक कारवाई केल्याने दारू विक्रेत्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.