……..तर आम्ही 1500 ऐवजी 3 हजार देऊ ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Published on -

Ladki Bahin Yojana : तुम्ही लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केलाय का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. सध्या जिकडे पहावा तिकडे लाडक्या बहिणीची चर्चा आहे. अगदी गाव खेड्यापासून ते दिल्लीपर्यंत लाडक्या बहिणीची चर्चा पाहायला मिळत आहे. विरोधातील नेते मंडळी या योजनेवरून सरकारला धारेवर धरत आहे तर दुसरीकडे सरकार या योजनेवरून स्वतःची पाठ थोपटत आहे.

खरंतर सरकारने जाहीर केलेली ही योजना मध्यप्रदेश राज्य सरकारच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमध्ये या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा बाराशे रुपये दिले जातात. मात्र आपल्या राज्यातील शिंदे सरकारने या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

पण सर्वच महिलांना याचा लाभ मिळत नाही. यासाठी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र राहणार आहेत. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला यासाठी पात्र आहेत. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यांच्या लाभासाठी पात्र ठरतात.

या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरणे सुरू झाले होते. 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू राहणार असे सांगितले गेले होते. मात्र आता सरकारने अर्ज प्रक्रिया 31 ऑगस्ट नंतरही सुरू राहणार असल्याची मोठी माहिती दिली आहे. या योजनेचा आतापर्यंत 90 लाखाहून अधिक पात्र महिलांना लाभ मिळाला आहे.

जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 90 लाखाहून अधिक महिलांना या योजनेच्या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळाले आहेत आणि अर्ज मंजूर झालेल्या उर्वरित महिलांच्या खात्यात रक्षाबंधनापर्यंत पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून प्राप्त झाली आहे.

अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री महोदय काल पुण्यात एका कार्यक्रमासाठी हजर होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा केली.

ते म्हणालेत की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे. उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही बळ दिलं तर दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील. दोन हजार होतील, अडीच हजार होतील, अडीच हजाराचे तीन हजार होतील.

या सरकारची ताकद वाढली, तीन हजारापेक्षा जास्त देण्याची ताकद आली, तर आम्ही हात आखडता घेणार नाही. सरकार तुमचं आहे. देण्याची नियत लागते, दानत लागते. ती आमच्या सरकारकडे आहे.”

म्हणजेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत जर महायुती सरकार सत्तेवर आले तर लाडक्या बहिणींना दीड हजारापेक्षा अधिकची रक्कम दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या विधानाची आणि घोषणेची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

तथापि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी पुन्हा एकदा सत्तेचे दरवाजे खुले करणार का हे पाहणे खरंच उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!