Ahmednagar Politics : विधानसभेच्या अनुशंघाने महाविकास आघाडीत जागा वाटप झाले नसले तरी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक जागांवर सध्या दावे प्रतिदावे केले जात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ठाकरे गट तीन जागा तर नक्कीच घेईल असे म्हटले जात आहे.
त्यात आता पारनेरची जागा लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना मिळणार की ठाकरे गट शिवसेनेला हे पाहावे लागेल. कारण या जागेवर ठाकरे गटाने दावा केला असून शिवसेनेच्या नेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पारनेरची जागा आपल्यालाच मिळणार असल्याचे छातीठोक सांगितले आहे.
पारनेर येथे शिवसेना उबाठा गटातर्फे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे व शिवसेनेतर्फे आयोजित महाराष्ट्र अस्मिता मेळाव्यात त्या बोलत होत्या.
काय म्हणाल्या अंधारे ?
पारनेरची जागा शिवसेनेचीच आहे. यापुढेही येथे शिवसेनेचाच उमेदवार असेल. त्या दृष्टीने तयारीला लागा. उमेदवार कोण हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील, पण पारनेर विधानसभेची जागा शिवसेनेचीच राहील, असा विश्वास शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांना दिला.
तसेच अहमदनगरमध्ये शिवसेनेची मशाल धगधगती ठेवायची असेल, तर त्यासाठी पारनेरची जागा महत्त्वाची आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी मागणी करणार असून, ती जागा आपण घेत आहोत, असे प्रतिपादन शिवसेनेच्या नेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केले.
कोण शब्द पाळतो, ते आता पाहू…
पारनेर ही शिवसैनिकांची खाण आहे. शिवसैनिकांवर झालेला अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी खा. नीलेश लंके यांच्या विजयासाठी मोठा वाटा उचलला.
शिवसैनिकांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला. लंके खासदार झाल्यावर ही जागा शिवसेनेला सोडली जाईल, असा शब्द दिला होता.
आता कोण शब्द पाळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पक्षप्रमुख ठाकरे जे नाव सुचवतील त्यांचेच काम आपल्याला करायचे आहे, अशी ग्वाही डॉ. श्रीकांत पठारे यांनी दिली.
राणी लंकेंचा पत्ता कट?
ठाकरे गटाने चालवलेली तयारी, लोकसभेला केलेली मदत, थेट अंधारे यांनी छातीठोकपणे पारनेर वर केलेला दावा यामुळे आता ही जागा ठाकरे गटाला सुटेल असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता राणी लंके यांना उमेदवारी मिळण्यास मोठे आवाहन उभे राहणार आहे.