Ahmednagar News : महाराष्ट्रभर गाजलेल्या नगर अर्बन बँक प्रकरणी सध्या तपास सुरु आहे. या प्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. दरम्यान या प्रकरणी आणखी एक महत्वाची बातमी आली आहे.
नगर अर्बन बँक प्रकरणी फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल व्हॉट्सअॅप ग्रुपवर आल्याने खळबळ उडाली आहे. हा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल व्हॉट्सअॅप ग्रुपवर कसा आला?
याचा अर्थ या तपासात कुणीतरी प्रभावी व्यक्ती हस्तक्षेप करत आहेत असे दिसते, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ग्रुप अॅडमिन व साईदीप अग्रवाल यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा आदेश तपासी अधिकाऱ्यास दिला आहे.
अर्बन बँकेतील अनियमितता प्रकरणात अविनाश वैकर यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यांनी जामिनासाठी खंडपीठात धाव घेतली होती. या सुनावणीत त्यांचे वकील ए. ए. यादगीकर बाजू मांडताना म्हणाले, ‘या प्रकरणात एक फॉरेन्सिक रिपोर्ट आहे जो अद्याप रेकॉर्डवर आणला गेला नाही.
आपल्या अशिलाला हा रिपोर्ट साईदीप अग्रवाल यांच्याकडून मिळाला. त्यावर न्यायमूर्ती एस. जी. मेहेर यांनी ‘फॉरेन्सिक रिपोर्ट रेकॉर्डवर न येता लोकांमध्ये जात असेल तर ती गंभीर बाब आहे. हा रिपोर्ट अग्रवाल यांना कोठून मिळाला?
अशीही विचारणा केली असता तो व्हॉट्सअॅप ग्रुपवरून मिळाला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अग्रवाल व ग्रुप अॅडमिन यांचेविरुद्ध कारवाई करा व न्यायालयाला चौकशीचा अहवाल द्या,
असा आदेश न्यायालयाने दिला. चौकशीत कोणी प्रभाव टाकत आहे का? हे न्यायालयाला सांगा असेही चौकशी अधिकाऱ्यास विचारण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ग्रुप अॅडमिन व साईदीप अग्रवाल यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा आदेश तपासी अधिकाऱ्यास दिला आहे.