आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आणि ताणतणावाच्या आयुष्यामध्ये अगदी तरुणांना देखील विविध प्रकारच्या आजारांनी ग्रासल्याचे आपल्याला दिसून येते. हृदयरोग तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या रोगांनी अगदी कमी वयातले तरुण देखील आता बळी पडल्याचे चित्र आहे.
त्यामुळे बऱ्याचदा हॉस्पिटलचा खर्च हा मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. त्यातल्या त्यात घरात जर ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते व वृद्धत्वामध्ये बऱ्याचदा अनेक आजारांचा प्रादुर्भाव जेष्ठ नागरिकांना होतो व मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलमध्ये खर्च करावा लागतो.
सध्या जर आपण वैद्यकीय सुविधा बघितल्या तर त्या खूप महाग झाल्या असून आपल्याला मोठ्या प्रमाणावर होणारा हा वैद्यकीय खर्च परवडत नाही. त्यामुळे या खर्चापासून जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर आरोग्य विमा हा एक चांगला पर्याय आहे.
जसा तरुणांसाठी आरोग्य विमा फायद्याचा ठरतो तसा तो घरातील आपले वृद्ध आई वडील तसेच इतर ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील फायदेशीर ठरू शकतो.
बाजारामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक चांगले विमा प्लॅन्स असून त्या माध्यमातून आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा पॉलिसी घेऊन होणाऱ्या वैद्यकीय खर्चापासून स्वतःला वाचवू शकतो. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण काही आरोग्य विमा प्लान बघणार आहोत जे जेष्ठ नागरिकांसाठी अतिशय फायद्याचे आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी फायद्याचे असलेल्या आरोग्य विमा प्लान
1- निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी– ही एक फायद्याची आणि महत्त्वाची अशी आरोग्य विमा पॉलिसी असून यामध्ये 66 वर्षाचे पुरुष आणि 61 वर्षाच्या महिलेला वार्षिक पाच लाख रुपयांचा विमा कव्हर मिळतो.
या पाच लाख रुपयांच्या आरोग्य विमा पॉलिसीकरिता महिन्याला 4896 रुपयांचा प्रीमियम भरणे गरजेचे असते व या पॉलिसीच्या माध्यमातून संपूर्ण देशात 270 कॅशलेस हॉस्पिटलचा समावेश करण्यात आलेला आहे व या हॉस्पिटलच्या खोलीच्या भाड्याला देखील कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही.
2- डिजिट सुपर केअर ऑप्शन( डायरेक्ट)- हे आरोग्य विमा पॉलिसी देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्त्वाचे असून डिजिट सुपर केअर ऑप्शन आरोग्य विमा पॉलिसीमध्ये ६६ वर्षांचे पुरुष आणि 61 वर्षांच्या महिलांचा समावेश करण्यात येतो
व या पॉलिसी अंतर्गत पाच लाखांचे विमा कव्हर मिळते. या प्लॅनमध्ये दरमहा तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रीमियम भरावा लागतो व या योजनेत 450 कॅशलेस हॉस्पिटलचा समावेश करण्यात आलेला आहे.
3- केअर सुप्रीम( सीनियर सिटीजन)- या आरोग्य विमा योजनेमध्ये 66 वर्षाचे पुरुष आणि 61 वर्षांच्या महिलांचा समावेश करण्यात आला आहे व या अंतर्गत सात लाख रुपयांचे वार्षिक विमा कव्हर उपलब्ध आहे.
या प्लानमध्ये दरमहा 3850 रुपये प्रीमियम भरावा लागतो व या योजनेमध्ये 279 कॅशलेस हॉस्पिटलचा समावेश करण्यात आलेला आहे. या विमा पॉलिसीमध्ये सिंगल प्रायव्हेट एसी रूम घेता येतो.
4- स्टार हेल्थ ॲशुअर इन्शुरन्स पॉलिसी– या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये ६६ वर्षाचे पुरुष आणि 61 वर्षीय महिलांचा समावेश करण्यात आलेला असून या अंतर्गत पाच लाख रुपयांचे विमा कव्हर मिळते.
पाच लाख रुपयांच्या या प्लॅन करिता तुम्हाला प्रत्येक महिन्याला 4643 रुपये प्रीमियम भरावा लागतो व या प्लॅनमध्ये देशातील जवळपास 284 कॅशलेस रुग्णालयांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पॉलिसी अंतर्गत हॉस्पिटलमध्ये खोलीच्या भाड्याची मर्यादा पाच हजार रुपये प्रति दिवस इतकी ठेवण्यात आलेली आहे.