Ahmednagar News : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात सरासरी १२३.६. मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे पावणेतीन महिन्यांत पावसाची सरासरी ४९०.७ मि.मी. इतकी झाली. एकूण पावसाच्या तुलनेत ११० टक्के पावसाची नोंद झाली आहे.
त्यामुळे नऊ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. भोसा खिंडीतून येणारे कुकडीचे पाणी, आठवडाभरापासून पाणलोट क्षेत्रासह नगर शहर, परिसरात पडणाऱ्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील सीना धरणात मोठी पाणी आवक झाली.
यामुळे सीना धरणाचा पाणीसाठा ६७.२६ टक्क्यांवर गेला आहे. यंदा सीना धरणाची पाणी पातळी मृतसाठ्याच्याही खाली गेली होती. या दरम्यान, येडगाव धरणातून भोसे खिंडीमार्फत सीना धरणात २७ जुलैपासून ३५० क्युसेक कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी सोडले.
यामुळे सीना धरणात २५ ऑगस्टपर्यंत ८ हजार ७४८.२५ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. सीना नदी उगमस्थानात व धरण पाणलोट क्षेत्रात आणि नगर शहर परिसरात झालेल्या पावसामुळे सीना नदीतून पाण्याची चांगली आवक झाली. सीना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन एकूण पाणीसाठा १६१४.७७ दशलक्ष घनफूट झाला आहे.
पाऊस मिलिमीटरमध्ये (टक्केवारी)
नगर : ५४५.३ (११४), पारनेर ५२६ (१२७), श्रीगोंदा : ५८० (१४४), कर्जत : ५६० (१२५), जामखेड ६२७ (१०९), शेवगाव : ५३०.५ (११४), पाथर्डी : ६३४ (१३४), नेवासा ३९८.५ (९३),
राहुरी : ३६७.३( ८५), संगमनेर : ३८४.४ (१०९.५), अकोले : ५८६ (१२०), कोपरगाव : ३७१.४ (९२), श्रीरामपूर : ३४८.३(७५.२), राहाता : ३५०.४ (७७.२)
धरणांतील पाणीसाठा (दलघफू)
भंडारदरा १०९२२, मुळा २४८४०, निळवंडे ७६५५, आढळा : १०६०, मांडओहोळ ५३, सीना १६१५, खैरी ५३३, विसापूर: १०५
गोदावरीला पूर
नाशिक जिल्ह्यासह कोपरगाव परिसरात होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. नांदूरमधमेश्वर धरणातून शनिवारी रात्री ९ वाजता ३० हजार क्यूसेक विसर्ग होता. मध्यरात्री तो वाढविण्यात आला.
रविवारी सकाळी सहा वाजता तो ३९ हजार करण्यात आला. त्यानंतर ८ वाजता ५२ हजार ३०८ क्यूसेक करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून प्रवाही झाली आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.