Ahmednagar Pune Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. जवळपास तीन-चार दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागांमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. पावसाच्या लपंडावामुळे अन ढगाळ हवामानामुळे खरीप हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे.
तथापि, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरावर गेल्या तीन-चार दिवसातही चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आजपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढणार असा अंदाज दिला आहे.
खरंतर गुजरात मध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. या कमी दाबाच्या क्षेत्राने महाराष्ट्रातील वातावरणातील बाष्प खेचले होते. परिणामी राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत नव्हती.
पण आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती होत आहे. आय एम डी ने आज राज्यातील जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुण्यात आणि अहमदनगर मध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
पुण्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
मात्र आता परिस्थिती बदलली असून आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरावर जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात सह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार ?
आज कोकणातील दक्षिणेकडील सर्वचं जिल्ह्यांमध्ये म्हणजेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
तसेच मध्य महाराष्ट्राच्या पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर या पाचही जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय आज उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव आणि विदर्भातील अमरावती, वर्धा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना सुद्धा आज येलो अलर्ट मिळाला आहे.