Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एका गावाची ‘मधाचे गाव’ ही योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निवड केली असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेने १० लाख तर राज्य सरकारने ५४ लाख रुपयांची तरतुद केली आहे.
सन २०२२ पासून राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील एका गावाची मधाचे गाव म्हणून विकसित करण्याची योजना सुरू केलेली आहे. त्या अंतर्गत अकोले तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागातील उडदावणे गावाची निवड जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत करण्यात आली.
या समितीमध्ये सीईओ आशिष येरेकर तसेच वनविभाग, नियोजन, उद्योग विभागाचे अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीच्या सभेमध्ये अकोले तालुक्यातील उडदावणे या गावाची निवड करण्यात आली असल्याची माहिती समितीचे सदस्य तथा सचिव प्रभारी जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंढे यांनी दिली आहे.
राज्यामध्ये यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव व सातारा जिल्ह्यातील माधरगाव या ठिकाणी ही योजना राबविण्यात आली असून ती कार्यान्वित करण्यात आली आहे.
अकोले तालुक्यातील उडदावणे हे गाव निसर्ग संपत्तीने नटलेले असून कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी आहे. उडदावणे गावचा परिसर हा संपूर्ण जंगलाने व्यापलेला आहे. मधाचे गाव म्हणून विकसित करण्यासाठी उडदावणे गावच्या ग्रामसभेतही हा ठराव घेण्यात आला आहे.
आता हा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रालय स्तरावर पाठविला जाणार आहे. उडदावणे गावात पारंपारिक मध उत्पादने करणारी कुटुंब असून आता त्यांना शास्रोक्त पद्धतीने मध उत्पादन व संकलन करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामसभेने २५ जणांची निवड केली आहे.
राज्य सरकारकडून उपलब्ध केलेल्या ५४ लाख रुपयांमधून ४ लाख रुपये मध पेटी वितरणासाठी, ५ लाख रुपये प्रशिक्षणासाठी, २० लाख रुपये इमारतीसाठी, ७ लाख रुपये माहिती दालनासाठी, ५ लाख रुपये मधाच्या नाममुद्रेसाठी, तर दहा लाख रुपये प्रशासकीय खर्चासाठी तरतूद करण्यात आली आहे.
शास्त्रोक्त पद्धतीने मध उत्पादन व संकलनास चालना देण्यासाठी खादी ग्रामोद्योगकडून जिल्ह्यामध्ये २ हजार ६४० मध पेट्यांचे वितरण करण्यात आलेले आहे. नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी, श्रीरामपूर, अकोले तालुक्यातील धुमाळवाडी, अंबड, राजुर, राहाता, पाथर्डी,
नेवासा याठिकाणी मधपेट्या वितरित केल्या आहेत. या माध्यमातून दरवर्षी सुमारे २१ हजार ४८९ किलो मध उत्पादन घेतले जाते. हा मध खादी ग्रामोद्योगाच्या मधुबन योजनेखाली महाबळेश्वर येथे खरेदी केला जात असल्याची माहिती जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंढे यांनी दिली.