आगामी विधासनभेच्या अनुशंघाने वातावरण तापायला लागलेय. प्रत्येक जण आता आपापल्या पद्धतीने कार्यवाही करत आहे. परंतु आता याच पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटलांवर अप्रत्यक्षपणे मोठा आरोप करण्यात आलायं.
तालुक्यातील चांगले वातावरण खराब करण्याचे काम सुरू आहे. लाखो रुपये खर्च करून सोशल माध्यमातून चुकीच्या बातम्या पाठवण्यासाठी बाहेरील राज्यातील यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत.

आपल्या भाषणाचे व्हिडिओ एडिट करून पाठवले जात आहे. जनतेच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न येत्या दोन महिन्यात होणार आहे असा थेट आरोप आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखे पाटील यांचे नाव न घेता केला केला. त्यांच्या या आरोपानंतर पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.
नुकतीच सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
आ. थोरात म्हणतात..
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना ज्यांना एक गुंठाही जमीन व नोकरी देता आली नाही. आपण त्यांना चांगल्या नोकऱ्या दिल्या, जमीन दिली. त्यांचे आदर्श पुनर्वसन केले. आज पाणी कुणी सोडत असेल, मात्र धरण आपण पूर्ण केले, हे जनतेला माहित आहे.
निळवंडेचे पाणी यावर्षी आपल्याला मुबलक मिळणार आहे. त्यामुळे उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर करावी. कारखान्याला आवश्यक कार्यक्षेत्रात स्वतःचा ऊस निर्माण झाल्यास बाहेरील ऊस आणण्याचे बंद होईल.
त्यामुळे ट्रान्सपोर्टचा खर्च वाचेल, असे झाल्यास राज्यात सर्वाधिक भाव देऊ, असे आश्वासन दिले. उसाचे जास्त गाळप झाल्यास को-जनरेशन वाढेल. जास्त वीज निर्मिती होईल.
इथेनॉल निर्मितीतून परकीय चलन देशाला मिळणार आहे. साखर कारखान्याने ऊस लागवडीचे शेड्युल शेतकऱ्यांना दिले पाहिजे. ऊस वेळेवर उचलला गेल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
एकरी उत्पादन वाढवणे गरजेच्या असून कमीत कमी ७० ते ८० टन एकरी उत्पादन मिळाले पाहिजे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या शिस्तीतून सर्व सहकारी संस्थांचा कारभार चालत असल्यामुळे आपल्या येथील सर्व संस्थांची नेत्रदीपक प्रगती असल्याचे त्यांनी सांगितले.