Kopargaon Jamin Rate : गेल्या काही वर्षांमध्ये वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, नागरिकीकरण अन वाढती लोकसंख्या यामुळे जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. सोने खरेदी करणे सोपे पण जमीन खरेदी करणे खूपच अवघड. कारण की, अनेकदा पैसा असूनही मोक्याच्या ठिकाणी जमीन मिळत नाही. यामुळे जमिनीला सोन्यापेक्षा अधिक महत्त्व आले आहे. लोकसंख्येचा आलेख सातत्याने वाढत आहे, भारत आता लोकसंख्येच्या बाबतीत चीनला ओव्हरटेक करून जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे.
म्हणून जमिनीचा मोठ्या प्रमाणात शॉर्टेज निर्माण होत आहे. हेच कारण आहे की आगामी काळातही जमिनीचे भाव असेच वाढत राहणार आहेत. यामुळे रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातही अशीच परिस्थिती आहे. कोपरगाव शहराचा विस्तार गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने झाला असून यामुळे शहरालगतच्या परिसरातील जमिनीचे भाव कोट्यावधींच्या घरात पोहोचले आहेत.

आता तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता विविध कारणांमुळे शहरात स्थायिक होताना दिसत आहे. मुलांचे शिक्षण, नोकरीं, उद्योग अन इतर अन्य कारणांमुळे ग्रामीण भागातील जनता शहरालगतच्या परिसरात आपले बस्तान बसवू लागली आहे. म्हणून जमिनीच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे आणि दरही विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. शहरालगत असणाऱ्या शेतीचे दर तीस लाखांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
तसेच प्लॉटचे दर सहा लाख ते वीस लाख रुपये प्रति गुंठा असे झाले आहेत. यामुळे शहरालगतच्या परिसरात प्लॉट खरेदी करणे किंवा शेती खरेदी करणे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरची गोष्ट बनली आहे. या भागातील बिल्डर लोकांनी सांगितल्याप्रमाणे येत्या काही दिवसात कोपरगावातील पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
पाच नंबरच्या तलावाचे काम पूर्ण झाल्यास या भागात फ्लॅट आणि प्लॉटचे भाव आणखी वाढणार आहेत. यामुळे आज आम्ही सध्या कोपरगाव शहरातील कोणत्या भागात जमिनीला काय दर मिळतोय याबाबत थोडक्यात आढावा घेतला आहे.
कोपरगावातील कोणत्या भागात जमिनीला काय भाव मिळतोय?
नगर-मनमाड रस्त्यावर असणाऱ्या साई सिटी परिसरात जमिनीचे दर कोट्यावधींच्या घरात पोहोचले आहेत. हा परिसर इतर कोणत्याही परिसराच्या तुलनेत झपाट्याने विकसित झाला आहे. किंबहुना अजूनही या परिसरात विकास कामे सुरूच आहेत.
खाजगी विकासकांकडूनही येथे मोठमोठे गृहप्रकल्प तयार केले जात आहेत. म्हणून या ठिकाणी प्लॉटचे भाव १८ ते २० लाख रुपये गुंठा असे आहेत, तर शेतीचे भाव कोटींमध्ये आहेत. दुसरीकडे जेऊर पाटोद्यामध्येही प्लॉटचे आणि जमिनीचे भाव आधी सारखे राहिलेले नाहीत.
धारणगाव रस्त्यावरील जेऊर पाटोदा शिवारात शेत जमिनीचे भाव ३० लाखांपासून सुरू होतात. तसेच, येथे प्लॉट सहाशे रुपये स्क्वेअर फुटापासून सुरू होत आहेत. एकंदर परिस्थिती पाहता कोपरगाव शहरालगत जमीन किंवा प्लॉट घ्यायचा असेल तर खिशात एक मोठी रक्कम असायला हवी.
या भागात गृहप्रकल्पाच्या कामांना मिळाली गती
नगर-मनमाड रस्त्यावर असणाऱ्या साई सिटी, भामानगर, रिद्धी-सिद्धीनगर, परिसरात अनेक गृहप्रकल्प पूर्ण झाली आहेत. यामध्ये व्यापारी आणि निवासी अशा दोन्ही प्रकल्पांचा समावेश आहे. अनेक जण या ठिकाणी निवासी मालमत्तेत गुंतवणूक करत आहेत. येथील अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेण्याकडे नागरिकांचा ओढा आहे. तसेच नगर- मनमाड रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी व्यापारी संकुल सुद्धा उभे राहात आहेत.
कोपरगाव शहरापासून जवळच असलेल्या ब्रीजलालनगर व परिसरातही अलीकडे मोठ्या प्रमाणात प्लॉटची खरेदी विक्री सुरू आहे. येथेही असंख्य प्लॉट उपलब्ध आहेत.
जेऊर पाटोदा शिवारात असणाऱ्या मातोश्रीनगर परिसरातसुद्धा वेगवेगळ्या गृह प्रकल्पांची कामे सुरू आहेत. काही गृह प्रकल्प पूर्ण देखील झाली आहेत. येथे नवीन उपनगरं वसत आहे. म्हणून या भागात प्लॉट खरेदी करण्यासाठी नागरिक विशेष आकर्षित होत आहेत.