Ahmednagar News : निसर्गाचा लहरीपणा,अतिवृष्टी, रोगराईचा सामना करत असताना अनेकदा शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. कधी कमी पावसामुळे तर कधी अतिवृष्टीमुळे पीक डोळ्यादेखत नष्ट होते.
मात्र शेतकऱ्याला काहीच करता येत नाही. त्यामुळे सरकारने मागील दोन वर्षांपासून अवघ्या १ रुपयात पीक विमा हि योजना आणली. या योजनेत शेतकऱ्याला कोणताच हफ्ता भरावा लागत नाही.

मात्र सध्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील ६६२ कोटी रुपयांच्या भरपाईची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. सरकार आणि विमा कंपनीच्या घोळात जिल्ह्यातील शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून या भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
यामुळे विमा कंपनी आणि सरकार पातळीवर यातून मार्ग काढत शेतकऱ्यांना लवकरच थकीत विम्याचे ६६२ कोटींचा रक्कम मिळावी, अशी मागणी नगर जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांकडून होत आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत गतवर्षी एक रुपयात ११ लाख ४० हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील १० पिकांचा विमा उतरवला होता. शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवतांना राज्य सरकार आणि विमा कंपनीत झालेल्या करारात १३० टक्क्यांपर्यंत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना विमा भरपाईची रक्कम अदा करण्यात येणार आहे.
यात ८० ते ११० टक्क्यांपर्यंत भरपाईची रक्कम संबंधीत विमा कंपनी आणि त्यापुढील १११ ते १३० टक्क्यांपर्यंतच्या नुकसानीची विमा कंपनी भरपाईची रक्कम ही राज्य सरकार विमा कंपनीला अदा करण्यात येणार होती.
नगर जिल्ह्यात पिका विमा योजना खरीप हंगाममध्ये पात्र शेतकऱ्यांना १ हजार १६२ कोटींची भरपाई रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ही नुकसान भरपाई कृषी विभागाच्या २०२३-२४ च्या खरीप हंगामातील पीक अहवालानूसार आहे.
या विमा योजनेत मूग, उदिड, मका, भात, तूर, कांदा, भुईमूग आणि सोयाबीन, कापूस, बाजरी हि दहा पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील विमा योजनेत पात्र असणाऱ्या मूग आणि उडीद पिकांची १०० टक्के भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली तर सोयाबीन आणि मका पिकांच्या नुकसानीच्या आहे.
२५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यात थोड्याफार प्रमाणात पीक विम्याची भरपाई रक्कम मिळालेली आहे. ही रक्कम ४८६ कोटींची असून अद्याप पात्र शेतकऱ्यांना विमा भरपाईच्या ६६२ कोटींची प्रतिक्षा आहे.
जिल्ह्यात विमा योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडील ८० ते ११० टक्क्यांपर्यंतची भरपाई मिळालेली आहे. आता राज्य सरकार पातळीवरील १११ ते १३० टक्क्यांपर्यंत खरीप पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईची प्रतिक्षा आहे.
ही रक्कम ६६२ कोटी असून राज्य सरकारकडून ती विमा कंपनीला अदा केल्यानंतर विमा कंपनी पात्र शेतकऱ्यांना विमा रक्कम अदा करणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सरकार आणि विमा कंपनी यात काय करार झाला याच्याशी शेतकऱ्यांचा संबंध नसून पात्र शेतकऱ्यांना विमा भरपाईच्या थकीत ६६२ कोटींची भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.