Ahmednagar News : सध्या कांदा, डाळिंब व भाजीपाला, फुले यांना चांगले भाव मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातून फळे देखील चोरून नेण्याच्या घटना समोर येत आहेत. आता कांद्याला चांगला भाव मिळत आहे त्यामुळे थेट मार्केट यार्डमधूनच कांद्याच्या गोण्या चोरी केल्या जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केट मध्ये असलेल्या आडत व्यापाऱ्यांच्या गाळ्यांसमोर ठेवलेल्या कांदा गोण्या चोरणाऱ्या चोरट्याला बुधवारी (दि.११) रात्री पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरलेल्या ११ कांदा गोण्या आणि त्या नेण्यासाठी त्याने भाड्याने केलेला महिंद्रा जितो कंपनीचा मालवाहू टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे.
योगेश माणिक मोरे (वय २४, रा. गवखेल, ता. आष्टी, जि. बीड) असे या चोरट्याचे नाव आहे. तो नेप्ती मार्केटमध्ये हमाली काम करत आहे. याबाबत कांदा आडत व्यापारी संजय अशोक जपकर (रा. नेप्ती, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी योगेश मोरे हा काही दिवसांपूर्वी संजय जपकर यांच्या आडतीवर हमाली करत होता. आता तो दुसरीकडे हमाली करत आहे.
या काळात गेल्या काही दिवसांपासून जपकर यांच्या आडतीवरून कांदा गोण्यांची चोरी होत होती. मात्र ही चोरी कोण करतय हे लक्षात येत नव्हते. त्यामुळे जपकर यांनी बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना सर्व कामगारांना दिल्या होत्या.
त्यात आरोपी योगेश मोरे यांने बुधवारी जपकर यांच्या आडत गाळ्यासमोरून ११ गोण्या चोरत त्या दुसरीकडे नेवून ठेवल्या. रात्री त्याने एक महिंद्रा कंपनीचा जितो मालवाहू टेम्पो भाड्याने करून त्यात त्या चोरलेल्या कांदा गोण्या टाकल्या. व त्या गोण्या नेप्ती मार्केटमधून बाहेर नेण्याचा प्रयत्न करत असताना जपकर यांचे कर्मचारी आणि बाजार समितीचे सुरक्षा रक्षकांनी तो टेम्पो पकडला.
या कांदा गोण्याबाबत योगेश मोरे याच्याकडे विचारणा केली असता तो समर्पक उत्तर देवू शकला नाही. त्यानंतर याबाबत नगर तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस पथक तात्काळ नेप्ती मार्केट मध्ये गेले. पोलिसांनी आरोपी योगेश मोरे याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने कांदा गोण्या चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला टेम्पोसह ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.