Ahmednagar News :महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी २०१९ मध्ये ज्या जागा जिंकल्या त्या जागा त्याच पक्षांकडे राहातील असा निर्णय झाल्याचे काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, महायुतीचे कोणतेही आव्हान आम्हाला वाटत नाही. कारण लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने त्यांना नाकारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत किमान १८० जागा जिंकून सत्ता स्थापन करेल असा खळबळजनक दावा देखील आ.थोरात यांनी केला आहे.
ते अहमदनगर येथे माध्यमांशी बोलत होते.यावेळी ते म्हणाले कि, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत. मात्र आगामी दोन महिन्यात निवडणूक होईल असे गृहित धरून सर्व पक्ष तयारीला लागले आहेत.
महाविकास आघाडीतील नेत्यांच्या जागा वाटपासंबंधी तीन बैठका झाल्या आहेत. या तीन बैठकींमध्ये किमान १२५ जागांबद्दल सहमती झाली आहे. उर्वरित जागांबद्दल चर्चा सुरु असून गणपती विसर्जनानंतर राजकीय पक्षाच्या जागा वाटप चर्चेला वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्वाची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मुस्लिमांनाही प्रतिनिधीत्व दिले जाईल . राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनीही काल बारामती येथे जागा वाटप जवळपास निश्चित झाले असल्याचे म्हटले होते. गणपतीनंतर अंतिम निर्णय होईल असे सांगितले.
महायुतीमध्ये जागा वाटपावरुन मारामारी होत आहे. त्यांच्याशी आमची तुलना करुन नका, असे सांगत थोरात म्हणाले की, आमच्याकडे मैत्रीपूर्ण चर्चा होत आहे.
एमआयएमने महाविकास आघाडीसमोर एकत्र निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला आहे का, यावर थोरात म्हणाले त्या संदर्भात मला काही माहित नाही. अशी चर्चा उच्चस्तरीय पातळीवर होत असते, वरिष्ठ नेत्यांशी एमआयएमने चर्चा केली असेल तर माहिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एमआयएमने राज्यात स्वंतत्र लढण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यावर थोरात म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना प्रतिनिधीत्व दिले पाहिजे, आम्ही सुद्धा मुस्लिम उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हिंदूत्वाची संकल्पना स्पष्ट केली आहे. ते कोणत्याही धर्माविरोधात नाहीत. धर्मा धर्मात भेद करत नाहीत, जे चुकीचे वागणारे आहेत आणि देश विरोधी काम करतात त्यांचा त्यांना विरोध असल्याचे थोरात म्हणाले.