Ahmednagar News : जिल्ह्यात १४ लाख ४६ हजार ९२४ शेतकरी संख्या असून ७ लाख ४६ हजार ३२६.७१ खरीप हंगामाचे क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख १३ हजार २८१.०५ क्षेत्रावर ई-पीक पाहणी शेतकऱ्यांनी केली आहे. उर्वरित क्षेत्राची पाहणी अद्यापही झालेली नाही.
तांत्रिक अडचणींमुळे ई-पीक पाहणी शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. ई-पीक पाहणी नोंदविताना शेतकऱ्यांना सर्व्हरडाउन, नेटवर्क, अँप न उघडणे, अँप रिस्टार्ट होणे, पिकाचा फोटो अपलोड न होणे, अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या ई-पीक पाहणीकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात अवघ्या ४१ टक्के शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना ऑनलाइन ई-पीक पाहणी सक्तीची केली आहे. या निर्णयामुळे परंपरागत पद्धतीने तलाठी स्तरावरील पीक पाहणीतील त्रुटी आणि अपूर्तता अथवा तक्रारी विचारात घेऊन आता शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातील उभ्या पिकांचे फोटो काढून पीक पाहणी अपलोड करण्याचे स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एका मोबाईलवरून २० खातेदारांची पीक पाहणी अपलोड करावयाची सोय असल्याने एका वस्ती-वाडीवर काही शेतकरी बांधवांकडे स्मार्ट फोन असला तरी ई-पीक पाहणी १०० टक्के होण्यास काहीही अडचण येणार नाही.
खरीप हंगाम ई-पीक पाहणी करण्यासाठीची १५ सप्टेंबर ही मुदत देण्यात आली आहे. या मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली नाही तर तलाठ्यामार्फत केली जाणार आहे.
अर्थात या ई-पीक पाहणीबाबत शेतकऱ्यांकडून निरुत्साह दाखविला आहे. गेल्या तीन वर्षापासून ई-पीक पाहणी उपक्रम राबविण्यात येतो. परंतू शेतकऱ्यांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही.
यंदा शासनाने ई-पीक पाहणी अप्लिकेशनचे नवीन व्हर्जन आणले आहे, यातही पुन्हा प्रयत्न करा’ अशी सूचना वारंवार दाखवत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ई-पीकपाहणी डोकेदुखी झाली आहे.