Ahmednagar News : सध्या भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेशात उद्भवलेल्या अस्थिरतेमुळे राज्यातील कांद्याला पुन्हा चांगला भाव मिळत आहे. नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सरासरी कांद्याला साडेपाच हजार रुपयांचा भाव मिळाला. शनिवारी २५१ ट्रक म्हणजे २७ हजार ६२७ क्विंटल कांदा विक्रिसाठी आणला होता.
मागील काही दिवस राज्यभर संततधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे अनेक भागातील वाहतूक ठप्प झाली होती. या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात एकीकडे घटती आवक त्यातच देशांतर्गत मागणी वाढल्याने कांद्याच्या भावात तेजी निर्माण झाली आहे. नगर बाजार समितीत शनिवारी झालेल्या कांदा लिलावात या हंगामातील सर्वाधिक ५५०० रुपये इतका मिळाला.
किरकोळ बाजारात हे भाव ६० ते ६५ रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. पुढील काळात कांद्याचे दर आणखी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी कांदा महागला आहे, तर हॉटेल हातगाड्यांवरील खाद्य पदार्थातून कांदा गायब झाला आहे.
त्यातच नगर बाजार समितीत शनिवारी कांद्याला ५५०० हजार रुपयांचा भाव मिळाला. कांद्याची आवक घटल्यामुळे कांद्याच्या दरात विक्रमी दरवाढ होत आहे. कांदा दर्जेदार असेल, तर निश्चितच कांद्याला चांगला भाव मिळत आहे. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत आहे.
यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे पुढील काळातही नवीन कांद्याची आवक होणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव आणखी काही दिवस कमी होणार नाहीत.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आनंदात आहेत. मात्र दुसरीकडे झालेल्या पावसामुळे मूग,उडीद, कापूस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा विक्री करून दोन रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडत आहेत.
शनिवारी झालेल्या लिलावात २७ हजार ६२७ क्विंटल कांदा विक्रिसाठी आणला होता. यातील उच्च प्रतीच्या कांद्याला ५५००, ५४००, ५३०० असा दर मिळाला आहे. तर त्यापाठोपाठ १ नंबरच्या कांद्याला ४५०० ते ५२००, २ नंबरच्या कांद्याला ३७०० ते ४५००, ३ नंबरच्या कांद्याला २७०० ते ३७००, ४ नंबरच्या कांद्याला १५०० ते २७०० असा दर मिळाला.