Sujay Vikhe Patil News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा उलट फेर पाहायला मिळाला. महायुतीच्या अनेक उमेदवारांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होता. सुजय विखे पाटील यांचा देखील गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांना निलेश लंके यांनी पराभूत केले.
लंके यांच्या विजयात शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ताकतवर नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. केंद्रीय नेतृत्व नेहमीच विखें यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. सोबतच विखें यांची स्पेशल यंत्रणा देखील नेहमीच निवडणुकीच्या काळात त्यांना मोठी मदत करत असते.
परंतु, पक्षश्रेष्ठी आणि स्वतःची यंत्रणा सोबत असतानाही लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे हा पराभव विखे पिता पुत्र यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी विखे पिता पुत्र सज्ज झाले आहेत.
ज्यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यांच्या विरोधात आता थेट निवडणूक लढवण्याची इच्छा सुजय विखे पाटील यांनी बोलून दाखवली आहे.
आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरात यांनाच थेट आव्हान देण्याचा सुजय विखे यांनी निर्णय घेतला आहे.
दरम्यान आता नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या या भूमिकेवर राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक अतिशय महत्त्वाचे विधान केले आहे. या विधानावरून डॉक्टर सुजय यांना त्यांचे पिताश्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा फुल सपोर्ट असल्याचे स्पष्ट होत आहे.
काय म्हणतात राधाकृष्ण विखे पाटील
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी असे म्हटले आहे की, “सुजय विखे निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्याला जो निर्णय घ्यायचा, तो त्यानं घ्यावा, आम्ही त्याच्या निर्णयाबरोबर आहोत.” राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना आव्हान द्यावं अशी त्यांचीही इच्छा असल्याचे दिसत आहे.
सुजय विखे यांच्या संगमनेर मधून निवडणूक लढवण्याच्या भूमिकेला एका प्रकारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपोर्ट केला आहे. महत्त्वाचे म्हणजे संगमनेर मतदारसंघ हा थोरात यांचा बालेकिल्ला. येथून निवडणूक लढवण्यासाठी महायुतीकडे दुसरा कोणी ताकतवर उमेदवार देखील नाहीये. यामुळे, या जागेवरून सुजय विखे पाटील यांना महायुतीकडून तिकीट दिले जाऊ शकते.
सुजय पाटील यांच्या उमेदवारीला पक्षातून फारसा विरोधही होणार नाही. जर येथून सुजय विखे यांनी नशीब आजमावले तर नक्कीच ही निवडणूक खूपच टफाईट होणार आहे. पण, संगमनेर विधानसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात अशी निवडणूक होणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.