Financial Planning:- जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीचा एक परफेक्ट असा टाइमिंग असतो व या टाइमिंग मध्येच ती गोष्ट करणे खूप गरजेचे असते. नाहीतर खूप मोठे नुकसान सहन करावे लागते किंवा वेळ निघून गेल्यानंतर ती गोष्ट केल्यास काहीही फायदा होत नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट असली तरी ती तिच्या कालावधीमध्येच पूर्ण करणे किंवा त्यासंबंधीच्या प्लॅनिंग करून ठेवणे खूप गरजेचे असते.
हाच मुद्दा जर आपण आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून किंवा आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून बघितला तर खूप महत्त्वाचा असतो. जीवनातील जे काही टप्पे असतात त्यामध्ये वयाच्या 25 ते 30 या कालावधीमध्ये बरेच तरुण हे करिअरच्या दृष्टिकोनातून सेट होण्याचा प्रयत्न करत असतात. या कालावधीमध्येच आपल्या पुढच्या आयुष्याबद्दलच्या सगळ्या प्लॅनिंग करून ठेवणे खूप गरजेचे असते.
परंतु नेमके या कालावधीतच प्रत्येक जण मौज मजा करण्यामागे लागतो व भविष्यकालीन आयुष्याच्या बाबतीत जो काही भक्कम पाया आपल्याला या कालावधीत आर्थिक दृष्टिकोनातून उभा करायचा असतो तोच आपण चुकवतो आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसतो.
अगदी याच प्रमाणे तुम्ही देखील वयाच्या 20 ते 30 वर्षाच्या कालावधीच्या टप्प्यात असाल तर तुम्ही काही गोष्टींचा प्लॅनिंग आतापासून करून ठेवणे खूप गरजेचे असते. जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आर्थिक दृष्टिकोनातून अडचणी येणार नाहीत व तुमचा उतार वयाचा कालावधी सुख समृद्धीने आणि आनंदात जाईल व तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
25 ते 30 वर्षाच्या कालावधीत असाल तर या गोष्टींचे करा आर्थिक नियोजन
1- विमा आवश्यक– सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या वयामध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गंभीर आजार झाला तर मात्र मोठ्या प्रमाणावर खर्च होतो व या वयात जर अशी परिस्थिती उद्भवली तर मात्र खूप मोठ्या प्रमाणावर त्याचे परिणाम आपल्याला पुढील आयुष्यावर बघायला मिळू शकतात.
त्यामुळे तुम्ही वयाच्या तिसाव्या वर्षी जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुमच्या संपूर्ण कुटुंबाकरीता आरोग्य विमा घेऊन ठेवणे आवश्यक आहे. तसेच दुर्दैवाने काही कारणामुळे तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबाचे पुढे काय होईल? या उद्देशाने तुम्ही आयुर्विमा घेऊन ठेवणे आवश्यक असते.
2- छोटी आर्थिक ध्येय ठरवा– वयाच्या 30 वर्षे पूर्वी तुम्ही अल्पमुदतीची गुंतवणूक सुरू करणे खूप गरजेचे आहे. अशा प्रकारची अल्पमुदतीची गुंतवणूक जर तुम्ही सुरू केली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील अल्पकालीन काही उद्दिष्टे असतील तर ती सहजपणे साध्य करू शकतात.
या माध्यमातून तुम्ही कार किंवा घर घेण्यासाठी लागणारा पैसा जमा करू शकतात किंवा भविष्य काळामध्ये मुलांचे शिक्षण तसेच त्यांचे लग्न इत्यादी करिता देखील पैसा या माध्यमातून जमा करणे शक्य आहे. या सगळ्या प्रत्येक बाबींकरिता तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीच्या गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवणूक करता येते.
3- निवृत्तीचे नियोजन आत्तापासून करा– वयाच्या 25 ते 30 वर्षाच्या कालावधीमध्ये बरेच जण पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याला प्राधान्य देतात. परंतु असे न करता तुम्ही जेव्हा या वयाच्या टप्प्यात असाल तेव्हा तुमच्या पुढच्या आयुष्याचे म्हणजेच तुमच्या निवृत्तीची नियोजन करून ठेवणे देखील खूप गरजेचे आहे व तुम्ही याकरिता नॅशनल पेन्शन सिस्टम अर्थात एनपीएस सारख्या सरकारी योजनेमध्ये पैसे गुंतवू शकतात व निवृत्तीनंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात आर्थिक दृष्टिकोनातून खूप समृद्ध राहू शकतात.
4- इमर्जन्सी फंड म्हणजे आपत्कालीन निधी जमा करणे– आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारचे संकट केव्हा येईल याचा आपण कुठल्याही पद्धतीने विचार करू शकत नाही. जीवन जगत असताना जर कुठल्याही पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर मात्र आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठ्या समस्या निर्माण होतात व अशाप्रकारे अचानकपणे उद्धवलेल्या परिस्थितीला आपण तोंड देऊ शकत नाही.
त्यामुळे तुम्ही जेव्हा 30 व्या वर्षापर्यंत जाल तेव्हा तुम्ही आपत्कालीन निधी तयार करण्याचे नियोजन सुरू करणे खूप गरजेचे आहे. आपत्कालीन निधी वेगवेगळ्या रकमेचा असू शकतो.
परंतु यामध्ये सरळ जर आपण बघितले तर तुमचे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत जर बंद झाले तर पुढील सहा महिने तुम्ही कुठल्याही प्रकारचे उत्पन्न न मिळवता देखील तुमचे महिन्याचे सगळे खर्च करू शकाल इतका तरी निधी तुम्ही जमा करून ठेवणे गरजेचे असते.
5- गाडी किंवा घर घेणे– आजकालची तरुणाई पाहिली तर त्यांनी पहिली नोकरी किंवा व्यवसाय सुरू केला की लगेच गाडी किंवा घर घ्यायच्या तयारीला लागतात. या दोन्हींपैकी जर तुमच्या डोक्यात काही विचार चालू असेल तर तुम्ही गाडी घेण्यापेक्षा तुमच्याकडे घर नसेल तर ते घर घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कारची तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही ती महागडी कार घेण्याऐवजी परवडेल अशा किमतीतली कार घेऊन तुमची गरज भागवून घेणे खूप आवश्यक असते. यामध्ये जर तुमच्याकडे तुमचे स्वतःचे घर असेल तर तुमची आर्थिक सुरक्षितता वाढवण्यासाठी याची खूप मदत होत असते.