Radhakrishan Vikhe Patil And Ajit Pawar : काल राज्य मंत्रिमंडळाची एक अतिशय महत्त्वाची बैठक संपन्न झाली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेत. मात्र याच बैठकित अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्यात वाद झाला असल्याचा दावा केला जात आहे.
खरे तर राज्य सरकारने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी दूध अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये एवढे अनुदान दिले जात होते. मात्र आता या अनुदानात दोन रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयामुळे नक्कीच राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हा निर्णय दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे घेण्यात आला आहे. मात्र मंत्री विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात हा निर्णय घेण्याआधी वाद झाला असल्याचे बोलले जात आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 10 रुपये एवढे अनुदान दिले गेले पाहिजे असा प्रस्ताव मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत मांडला होता. मात्र हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी एवढे पैसे आणायचे कोठून असा सवाल उपस्थित करत यावर नाराजी व्यक्त केली असल्याचे बोलले जात आहे.
कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुग्ध व्यवसाय विकास खात्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी दिल्या जाणाऱ्या पाच रुपयांच्या अनुदानात डबल वाढ व्हावी याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. म्हणजेच गाईच्या दुधासाठी दहा रुपयांचे अनुदान मिळावे असा आशयाचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला गेला.
मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये राज्य सरकारने वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. आता या असंख्य योजनांसाठी राज्याच्या तिजोरीत पैसा असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीतच दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दहा रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव दुग्ध व्यवसाय विकास विभागाने मांडला.
अजित पवार यांनी यासाठी पैसे कुठून आणायचे असा संतप्त सवाल करत यावर नाराजी व्यक्त केली. या मुद्द्यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये वादविवाद देखील झालेत. मात्र नंतर विखे पाटील यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर तोडगा निघाला अन राज्यातील दूध उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.